अकोलेकरांना दिलासा; ‘काटेपूर्णा’त २०० दिवसाचा जिवंत जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:21 PM2019-09-14T12:21:48+5:302019-09-14T12:30:18+5:30
अकोलकरांची २०० दिवस तहान भागणार असल्याने अकोलेकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला: अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात आजमितीस (२० दशलक्ष घनमीटर) २३.१६ टक्के जिवंत जलसाठा उपलब्ध झाला असून, या साठ्यात अकोलकरांची २०० दिवस तहान भागणार असल्याने अकोलेकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. केवळ अकोला शहराची तहान भागवायची असेल तर धरणात किमान ३० टक्के पाण्याची गरज आहे.
अकोल्याची लोकसंख्या वेगाने वाढत असून, अकोला महापालिकेंतर्गत २४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला आवशक पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी अलीकडच्या काही वर्षांत काटेपूर्णा धरणाचे पाणी कमी पडत असून, मागील १० ते १५ वर्षांपासूनचे हे चित्र आहे. सध्या तर आठवड्यातून एकाच वेळी पाणी पुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी काटेपूर्णा धरणात कि मान ३५ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच अकोल्यासह ६४ खेडी व मूर्तिजापूरला पाणी पुरवठा करता येईल; यावर्षी आतापर्यंत काटेपूर्णा धरणात २० दलघमी, २३.१६ टक्केच जलसाठा उपलब्ध झाला असून, या पाण्यात दोनशे दिवस अकोलेकरांची तहान भागू शकते. सध्या पावसाचे वातावरण असल्याने दमदार पाऊस पडून धरणात आणखी जलसंचय वाढण्याची अकोलकरांना प्रतीक्षा आहे.
महिन्याला १.५ दलघमी पाणीपुरवठा
सद्यस्थितीत शहराला आठवड्यातून एकादा पाणीपुरवठा करण्यात येत असून, ५३० लाख लीटर पाणी सोडण्यात येत आहे. या पद्धतीने पाणी सोडल्यास महिन्याला १.५ दीड दशलक्ष घनमीटर पाण्याचा पिण्यासाठी वापर होईल. जलवहिनी फुटून पाण्याचा अपव्यय व उन्हाने होणारे पाण्याचे बाष्पीभवन धरल्यास केवळ अकोला शहरासाठी ३० टक्के पाण्याची गरज आहे.
जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प
जिल्ह्यात दोन मोठे धरण असून, आजमितीस या प्रकल्पांमध्ये ५३.४७ टक्के जलसाठा आहे. यातील सर्वात जास्त जलसाठा वान धरणात ९१.३८ टक्के असल्याने ही टक्केवारी वाढली आहे. चार मध्यम प्रकल्पाची जलपातळी ३१.८६ टक्के आहे. यात मोर्णा धरणात ३८.४५ टक्के, निर्गुणा ३१.७२ टक्के, उमा धरणात २५.२६ तर घुंगशी बॅरेजमध्ये ४५.१७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात ४० लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ४०.५२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
एमआयडीसीला ‘काटेपूर्णा’तून पाणी नाही!
प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्यास असल्याने अकोला शहर, ६४ खेडी पाणीपुरवठा योजना व मूर्तिजापूर शहराची पाण्याची सोय झाली तरच एमआयडीसीला पाणी देण्यात येईल. यासाठी किमान ३५ दशलक्ष घनमीटरच्यावर धरणात पाणीसाठा होेण्याची आवशकता आहे.
तर यावर्षी सिंचनाला पाणी नाही!
सिंचनासाठी पाणी सोडण्यासाठी धरणात ५० टक्केच्या वर जलसाठा असावा लागतो. तथापि, काटेपूर्णा धरणात आजमितीस २३.१६ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी सध्या तरी सिंचनाच्या पाण्याचे नियोजन शक्य नाही.
काटेपूर्णा धरणात २३.१६ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यात दोनशे दिवस सहज काढता येतील. तथापि, त्यासाठी काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. आणखी पावसाचे दिवस असल्याने धरणाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
- चिन्मय वाकोडे,
कार्यकारी अभियंता,
अकोला.