बंद पडलेल्या ४२२ योजनांचा पाणी पुरवठा सुरु !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 02:30 PM2019-04-28T14:30:54+5:302019-04-28T14:31:00+5:30
थकीत वीज देयकापोटी जिल्ह्यात बंद पडलेल्या ४२२ स्वतंत्र नळ योजनांचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
- संतोष येलकर
अकोला : दुष्काळी परिस्थितीत थकीत वीज देयकांच्या मुद्दल रकमेपैकी पाच टक्के रकमेचा भरणा मार्च अखेरपर्यंत जिल्हा परिषदमार्फत महावितरण कंपनीकडे करण्यात आला. त्यानंतर थकीत वीज देयकापोटी जिल्ह्यात बंद पडलेल्या ४२२ स्वतंत्र नळ योजनांचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या ग्रामीण आणि नागरी भागातील ज्या पाणी पुरवठा योजना थकीत विद्युत देयकांची रक्कम भरली नसल्याने बंद आहेत, तसेच या पाणी पुरवठा योजना सुरू केल्यानंतर लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो, अशा पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या मुद्दलपैकी पाच टक्के रक्कम शासनामार्फत टंचाई निधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या भागातील पाणी पुरवठा योजनांच्या नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीतील वीज देयकांचा खर्च भागविण्यासाठी टंचाई निधीतून निधी वितरित करण्यास १७ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार शासनामार्फत प्राप्त निधीतून ३० मार्चपर्यंत जिल्ह्यातील ४२२ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांतील पाच टक्के, २६ लाख ११ हजार २६६ रुपये रकमेचा भरणा जिल्हा परिषदमार्फत महावितरण कंपनीकडे करण्यात आला. थकीत वीज देयकांतील मुद्दल रकमेपैकी पाच टक्के रकमेचा भरणा करण्यात आल्याने, महावितरणमार्फत संबंधित पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे थकीत वीज देयकांपोटी जिल्ह्यात बंद पडलेल्या ४२२ स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनांचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.
थकीत वीज देयकांचा भरणा केलेल्या पाणी पुरवठा योजना!
तालुका योजना
बार्शीटाकळी ५६
अकोट ०५
तेल्हारा १२६
बाळापूर १०६
पातूर २३
मूर्तिजापूर १०६
....................................
एकूण ४२२
टंचाईत २.७७ लाख ग्रामस्थांना दिलासा !
थकीत वीज देयकांच्या मुद्दल रकमेपैकी पाच टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर जिल्ह्यातील ४२२ स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाई परिस्थितीत या योजनांतर्गत गावांतील २ लाख ७७ हजार ४० ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.