६४ गावांचा पाणीपुरवठा, शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा गाजला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2016 03:10 AM2016-09-15T03:10:05+5:302016-09-15T03:10:05+5:30
‘बीडीओ’विरुद्ध कारवाईसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार.
अकोला, दि. १४ : खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत खांबोराजवळील उन्नई बंधारा ड्राय झाल्याने, ६४ गावांतील बंद झालेला पाणीपुरवठा आणि पातूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या परवानगीविना गटविकास अधिकार्यांनी आंतरजिल्हा बदलीत एका शिक्षिकेला रुजू करून घेण्याचा मुद्दा बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत खांबोराजवळील उन्नई बंधार्यातील पावसाचे पाणी संपल्याने, ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत गावांमधील ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जिल्हा परिषदेची परवानगी न घेता पातूर पंचायत समिती अंतर्गत आंतरजिल्हा बदलीने एका शिक्षिकेला रुजू करून घेण्याचा प्रताप तत्कालीन गटविकास अधिकारी गजानन वेले यांनी केला असून, यासंदर्भात त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी कारणे नोटीस बजावली आहे. याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये १४ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाले. या पृष्ठभूमीवर खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा बंद झालेला पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य रेणुका दातकर यांनी १४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. उन्नई बंधार्यातील पाणी संपल्याने ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला असून, या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांसोबत चर्चा केल्यानंतर पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. कोपूलवार यांनी सभेत दिली.