अज्ञात व्यक्तीने पाईपलाईन फोडल्याने पाणी पुरवठा ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:13 AM2021-06-30T04:13:22+5:302021-06-30T04:13:22+5:30
गावाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये विविध अडचणी येत आहे. एका आठवड्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने चान्नी फाट्याजवळ असलेल्या विहिरीमधून येणाऱ्या पाण्याचा एक ...
गावाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये विविध अडचणी येत आहे. एका आठवड्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने चान्नी फाट्याजवळ असलेल्या विहिरीमधून येणाऱ्या पाण्याचा एक व्हॉल्व्ह बंद केला होता. त्यामुळे गावाचा पाणी पुरवठा बंद होता. तर दुसरीकडे गोदामजवळ असलेल्या एका पाण्याच्या टाकीत मांजर पडले होते. त्यामुळे त्या भागातील पाण्याचा वापरही बंद केला होता. ग्रामपंचायतने ते मांजर काढून पाणी पुरवठा सुरळीत केला होता. तर आता अज्ञात व्यक्तीने गावातील इंदिरानगरकडे जाणारी पाईपलाईन धारधार शस्त्राने फोडली असल्याचे समोर आले आहे. यामुळे या भागातील पाणी पुरवठा खंडित झाला आहे. तसेच खैवाडी येथील विहिरीत असलेल्या मोटारपंपला बांधलेले दोरसुद्धा तोडण्यात आले आहे. या विविध घटनांमुळे गावातील पाणी प्रश्न पेटला आहे. अनेक ठिकाणी पाणी पोहोचले नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी हे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अज्ञात व्यक्तीकडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्यात आले असून या घटना राजकीय द्वेषातून केल्या जात असल्याचे मत सुबोध डोंगरे, अय्याज साहिल, सुनील मानकर आदी युवकांनी व्यक्त केले.
शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला बुधवारी तक्रार देण्यात येणार आहे.
- मंगेश तायडे, सरपंच, वाडेगाव
या विविध घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ पाणी समस्येला कंटाळले आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतकडून पावले उचलण्यात येणार आहे. जेणेकरून इतरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही.
- शेख सलीम शेख रहुल्ला, ग्रामपंचायत सदस्य, वाडेगाव