काटेपूर्णा धरणातील जलसाठा पुरणार १२० दिवस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 02:17 PM2019-08-20T14:17:42+5:302019-08-20T14:17:51+5:30
८.८२ टक्के उपलब्ध झाला असून, हा जलसाठा १२० दिवसावर अकोलेकरांची तहान भागवू शकतो, असे तज्ज्ञाचे मत आहे.
अकोला: काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात २६ दिवसात केवळ ५.३२ टक्के वाढ झाली आहे. २३ जुलै रोजी या धरणात ३.५ टक्के जलसाठा शिल्लक होता. आजमितीस ८.८२ टक्के उपलब्ध झाला असून, हा जलसाठा १२० दिवसावर अकोलेकरांची तहान भागवू शकतो, असे तज्ज्ञाचे मत आहे.
काटेपूर्णा धरणाचे पाणलोट क्षेत्र वाशिम जिल्ह्यातील काटा येथे आहे; परंतु काटानंतर छोटे-मोठे १२ प्रकल्प असून, या प्रकल्पातही अपेक्षित साठा झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी काटेपूर्णा धरणात पोहोचणे कठीण आहे. याकरिता पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे. काटेपूर्णा धरणाच्या परिसरात जूनपासून आतापर्यंत २४७.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पडणाऱ्या पावसाच्या भरवशावर जलसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.
अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या कुशीत वसलेल्या वान धरणात ७५.८९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या धरणाच्या परिसरात आतापर्यंत ८७१.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, दोन ते तीन वेळा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरण शून्य टक्के होते २३ दिवसात या धरणाच्या परिसरात ३७१.० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली असून, आजमितीस १४.०४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील मोर्णा धरणाची अवस्थाही अशीच होती. या धरणाच्या परिसरात ६१९.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, आजमितीस २०.६७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणाच्या परिसरात आतापर्यंत केवळ २६०.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शून्य टक्के असलेल्या या धरणात आजमितीस ६.३४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील घुंगशी बॅरेजचा जलसाठाही शून्य टक्के होता. आजमितीस ७.३० टक्के पाणी उपलब्ध आहे.