काटेपूर्णा धरणातील ४.५ टक्के जलसाठ्यातून होतोय ‘एमआयडीसी’ला पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:19 PM2019-07-15T12:19:53+5:302019-07-15T12:20:06+5:30
अकोल्यातील उद्योगांसाठी कुंभारी तलाव आरक्षित आहे; पण जर महान धरणातील जलसाठा संपुष्टात आला, तर अकोलेकरांची परीक्षा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही.
अकोला : अकोलेकरांची तहान भागविणाऱ्या महानच्या काटेपूर्णा धरणातील जलसाठा साडेचार टक्क्यांवर शिल्लक राहिलेला असतानादेखील त्यातून औद्योगिक वसाहतींच्या उद्योगांना पाणी पुरवठा केला जात आहे. उद्योगांसाठी कुंभारीच्या तलावाचा जलसाठा असताना ते आरक्षित ठेवण्यात आले आहे. जर पावसाने दांडी मारल्यास अकोलेकरांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
यंदा पाहिजे तसा मान्सून महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा परिसरात आला नाही. त्यामुळे जुलै महिना लागला असतानाही वातावरणात गारवा नाही. पावसाळा असतानादेखील पाऊस नावाला नाही. आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस आहे की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे अकोलेकरांवर पाणीटंचाईचे संकट कायम आहे. अशी परिस्थिती असतानादेखील जिल्हा प्रशासनातर्फे पाणीटंचाईच्या उपाययोजनांची खबरदारी अद्याप सुरू झालेली नाही. अकोला महानगराची तहान भागविणाºया महानच्या काटेपूर्णा धरणात साडेचार टक्के जलसाठा आजच्या घडीला शिल्लक आहे. हा जलसाठा काही महिन्यांचा असला तरी, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईसाठीची पावले उचललेली नाहीत. साडेचार टक्के जलसाठ्यातून अकोला एमआयडीसीच्या चारशे उद्योगांना दैनंदिन पाणी पुरवठा केला जात आहे. वास्तविक पाहता, अकोल्यातील उद्योगांसाठी कुंभारी तलाव आरक्षित आहे; पण जर महान धरणातील जलसाठा संपुष्टात आला, तर अकोलेकरांची परीक्षा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जमिनीतील जल स्तरही कमी झालेला आहे. शहरातील अनेक नागरी वसाहतींमधील कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. अशा स्थितीत कुंभारीचा पर्यायी जलसाठा ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्याने अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
-अकोला एमआयडीसीच्या उद्योगांना तूर्त महान धरणातील खांबोरा प्रकल्पातून पाणी पुरवठा होत आहे. कुंभारी तलावातील जलसाठा हा उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
-संजय जलतारे, उपकार्यकारी अभियंता, एमआयडीसी अकोला.