नया अंदुरा प्रकल्पातून पाणी पुरवठा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:12 PM2019-06-17T13:12:42+5:302019-06-17T13:12:48+5:30
प्रस्ताव बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे.
अकोला : बाळापूर तालुक्यातील खारपाणपट्ट्यात असलेल्या कायम टंचाईग्रस्त २६ गावांना स्वतंत्र प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करून या परिसरातील अनुसूचित जातींच्या प्राबल्याने कल्याणाच्या कार्यक्रमात ही योजना घ्यावी, असा प्रस्ताव बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. त्यासाठी शुक्रवारी या गावांतील सरपंच व सचिवांची बैठक त्यांनी घेतली.
खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये गोड्या पाण्याची समस्या बिकट आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. त्यातून वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने या गावांमध्ये कायमस्वरूपी टंचाई असते. या समस्येतून २६ गावांना बाहेर काढण्यासाठी बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथे तयार झालेल्या नया अंदुरा संग्राहक प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, योजनेच्या कामासाठी सर्व्हे करणे, अंदाजपत्रक तयार करणे, आराखडे तयार करणे तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी लागणारा निधी योजनेव्यतिरिक्त स्वतंत्र मंजूर करावा, असा प्रस्ताव आमदार सिरस्कार यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे.
- या गावांसाठी प्रादेशिक योजना
प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांमध्ये समाविष्ट होणाऱ्या गावांमध्ये बाळापूर तालुक्यातील अंदुरा (नया), अंदुरा (जुना), बोरगाव वैराळे, सोनाळा, अंत्री मलकापूर, निंबा, निंबी, नागद, सागद, जानोरी, स्वरूपखेड, मोखा, हिंगणा, बहादुरा, हाता, निमकर्दा, कळंबा, कळंबी, मोरगाव सादिजन, अडोशी, कडोशी, टाकळी निमकर्दा, काजीखेड, खंडाळा, मांजरी, गायगाव, दगडखेड, कुंभारी, बोराळा, बोरवाकडी.
अकोला तालुका : आगर, उगवा, पाळोदी, गोत्रा, नवथळ, सुकोडा, कानडी, अमानतपूर, मोरगाव (भाकरे), खडकी टाकळी, माझोड, निराट, वैराट राजापूर, सांगवी खूर्द, भोड, सांगवी बाजार, धामणा, लोणाग्रा, सांगवी मोहाडी, मंडाळा, दुधाळा, टाकळी जलम, कंचनपूर, गोपालखेड, ताकोडा, सिसा, मासा, परितवाडा, बादलापूर, बाखराबाद.