अभयारण्यातील पाणवठय़ांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा
By Admin | Published: April 25, 2016 01:58 AM2016-04-25T01:58:23+5:302016-04-25T01:58:23+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्प व काटेपूर्णा अभयारण्यातील श्वापदांना आता कृत्रिम पाणवठय़ांचा आधार.
राम देशपांडे/अकोला
अकोला जिल्हय़ातील काटेपूर्णा अभयारण्यातील तथा आकोट तालुक्यातील नरनाळा-मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक नद्या-नाले व तलाव कोरडे पडले आहेत. जंगलातील श्वापदांची पाण्याच्या शोधात भटकंती सुरू असून, या परिस्थितीवर मात करण्यासाठी वन विभागाच्यावतीने ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठय़ांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे.
वाढत्या तापमानामुळे दुष्काळाची दाहकता आणखी तीव्र होत चालली आहे. याचे परिणाम मेळघाट आणि काटेपूर्णा अभयारण्यातील श्वापदानांसुद्धा भेडसावू लागले आहेत. जिल्हय़ाच्या उत्तरेकडील आकोट तालुक्यातील नरनाळा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील व जिल्हय़ाच्या दक्षिणेला असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यातील बहुतांश नद्या, नाले व तलाव कोरडेठण्ण पडले आहेत. दुष्काळाची दाहकता श्वापदांनादेखील भेडसावत असल्याने पाण्याच्या शोधात त्यांची वणवण सुरू आहे. दरवर्षी उन्हाळय़ात निर्माण होणारी ही परिस्थिती लाक्षात घेऊन, वन विभागाच्यावतीने मेळघाट आणि नरनाळा अभयारण्यात अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. नैसर्गिक जलस्रोत कमी झाल्याने जनावरे अरण्यालगतच्या गाव खेड्यांकडे वळू लागली आहेत. तहानेने व्याकूळलेल्या श्वापदांना पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून वन्यजीव विभागाच्यावतीने या कृत्रिम पाणवठय़ांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत आहे. वन विभागाच्या कर्मचार्यांनी सुरू केलेली ही मोहीम संपूर्ण मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह नरनाळा अभयारण्यातदेखील राबविण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ज्या ठिकाणी टँकरसुद्धा पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी असलेल्या कृत्रिम पाणवठय़ांजवळ सोलरवर चालणारे हातपंप लावण्यात आले असून, नरनाळय़ाच्या पायथ्याशी असलेल्या कृत्रिम पाणवठय़ांमध्ये किल्ल्यावरील तलावातून पाणी पोहोचविण्यासाठी नैसर्गिक मार्ग तयार करण्यात आले आहेत. यंदाचा उन्हाळा अभयारण्यातील श्वापदांना तापदायक ठरू शकतो, याची पूर्वकल्पना असल्याने वन विभागाने श्वापदांची तहान भागविण्यासाठी आवश्यक पाऊले उचलली असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.