आजपासून आठव्या दिवशी होणार पाणीपुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:25 AM2017-08-22T00:25:56+5:302017-08-22T00:25:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पावसाने दडी मारल्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता अकोलेकरांना आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले असून महापालिकेने २२ आॅगस्टपासून अकोलेकरांना दर आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोलेकरांना महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आजरोजी धरणात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा तसेच पावसाची स्थिती लक्षात घेता महापालिकेच्या जलप्रदाय विभागने पाणीपुरवठयाचे नियोजन केले असून जिल्हाधिकारी यांचे निर्देश व मनपा आयुक्त लहाने यांच्या सूचनेनुसार आता आठव्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता विजय समदूरकर यांनी सांगीतले.
आज होणारा पाणीपुरवठा
२२ आॅगस्टपासून पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून, दर आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जलप्रदाय विभागाने घेतला आहे. त्यानुसार २२ आॅगस्ट रोजी शहरातील महाजनी प्लॉट जलकुंभ, आदर्श कॉलनी जलकुंभ, हरिहर पेठ जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, शिवनगर जलकुंभ परिसरात पाणी पुरवठा होणार आहे.