जलकुंभ, जलवाहिन्यांची कामे अर्धवट; सभापती म्हणाले कारवाई करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 10:58 AM2021-07-01T10:58:42+5:302021-07-01T10:58:52+5:30
Akola Municipal Corporation : सभापती संजय बडाेणे यांनी ‘एपी ॲण्ड जीपी’ एजन्सीला दंड आकारून कारवाई करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.
अकाेला : ‘अमृत अभियानां’तर्गत शहराच्या कानाकाेपऱ्यात टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांची कामे अर्धवट असून, अद्यापही जलकुंभांपर्यंत जाेडणी न केल्यामुळे नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. कंत्राटदाराने जुने शहरातील जलकुंभाच्या उभारणीकडे पाठ फिरवली आहे. जलवाहिनीसाठी जागाेजागी रस्ते खाेदण्यात आल्याने नागरिकांच्या राेषाला सामाेरे जावे लागत असल्याचा संताप सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केल्यानंतर स्थायी समिती सभापती संजय बडाेणे यांनी ‘एपी ॲण्ड जीपी’ एजन्सीला दंड आकारून कारवाई करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.
महापालिकेत बुधवारी सायंकाळी ४ वाजता स्थायी समितीच्या सभेचे ऑनलाइन प्रणालीद्वारे आयाेजन करण्यात आले हाेते. सभेला सुरुवात हाेताच शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा याेजनेची कामे खाेळंबली असून, यामुळे सर्वपक्षीय नगरसेवक वैतागल्याचे सांगितले. पाणीपुरवठा याेजनेचे काम करणाऱ्या एजन्सीने मनमानीचा कळस गाठल्यामुळे त्याविराेधात ठाेस कारवाई करण्याचा प्रस्ताव मिश्रा यांनी मांडला. जुने शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानालगतच्या शासकीय जागेवर जलकुंभाच्या उभारणीला कंत्राटदाराने नकार दिल्याचे आश्चर्य व्यक्त करीत याप्रकरणी कंत्राटदाराविराेधात काेणती कारवाई केली, असा सवाल भाजपचे नगरसेवक सतीश ढगे यांनी उपस्थित केला. त्यावर यासंदर्भात एमजेपीला पत्राद्वारे माहिती मागितली असून, ते प्राप्त हाेताच कारवाईची पुढील दिशा ठरवली जाईल, असे उपायुक्त वैभव आवारे यांनी स्पष्ट केले. शिवर येथील जलकुंभ व जलवाहिनीची कामे तातडीने निकाली काढण्याची सूचना भाजपचे सदस्य अनिल मुरूमकार यांनी केली.
रेल्वे स्टेशन चाैकातील जलकुंभाचे काम निकृष्ट
रेल्वे स्टेशन चाैकातील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक २१ च्या आवारात दलित वस्ती निधीतून उभारण्यात आलेल्या जलकुंभात कमी पाण्याची साठवणूक केली जात असल्याचा मुद्दा काँग्रेसचे नगरसेवक पराग कांबळे यांनी मांडला. या जलकुंभाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, याप्रकरणी कंत्राटदाराविराेधात कारवाई करण्याची मागणी राजेश मिश्रा, पराग कांबळे, माेहम्मद इरफान यांनी लावून धरली. त्यावर सभापतींनी शिक्कामाेर्तब केले.
भूमिगतसाठी १२ काेटी मंजूर
भूमिगत गटार याेजनेंतर्गत शिलाेडा येथे उभारण्यात आलेल्या ३० एमएलडी प्लांटचे काम पूर्णत्वास आले आहे. यादरम्यान जादा परिमाण व अतिरिक्त बाबीसाठी बचत असलेल्या रकमेतून १२ काेटी १५ लाख रुपयांच्या प्रस्तावाला सभेने मंजुरी दिली.