जुने शहरातील आंबेडकर मैदानालगतच उभारणार जलकुंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:42 PM2019-05-17T13:42:59+5:302019-05-17T13:43:03+5:30

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी आंबेडकर मैदानालगतच्या जागेवरच जलकुंभ उभारणार असल्याचे स्पष्ट केले.

Water tank will be built at Ambedkar ground in Old City! | जुने शहरातील आंबेडकर मैदानालगतच उभारणार जलकुंभ!

जुने शहरातील आंबेडकर मैदानालगतच उभारणार जलकुंभ!

googlenewsNext

अकोला: केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत जुने शहरातील आंबेडकर मैदानाच्या बाजूला उभारल्या जाणाºया जलकुंभाला स्थानिक रहिवासी व अतिक्रमकांनी आडकाठी निर्माण करीत मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी आंबेडकर मैदानालगतच्या जागेवरच जलकुंभ उभारणार असल्याचे स्पष्ट केले असून, पोलीस बंदोबस्तात जलकुंभाचे कामकाज सुरू करण्याचा आदेश गुरुवारी जलप्रदाय विभागाला दिला.
केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहराच्या पाणी पुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामासाठी शासनाने ११० कोटी मंजूर केले. त्यापैकी ८७ कोटींची निविदा प्रकाशित करण्यात आली होती. जलवाहिनीचे जाळे टाकण्यासोबतच शहराच्या विविध भागात आठ ठिकाणी नवीन जलकुंभाची उभारणी केली जात आहे. याचा कंत्राट ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीला देण्यात आला असून, आठपैकी सहा जलकुंभांच्या उभारणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. यादरम्यान, जुने शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने आंबेडकर मैदानलगतची जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याच्या उद्देशातून मनपाच्या जलप्रदाय विभागासह अतिक्रमण विभागातील अधिकारी, कर्मचारी जागेवर पोहोचले असता, त्यांना स्थानिक रहिवाशांनी धक्काबुक्की, धमक्या व शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. यासंदर्भात गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय विभागाचा आढावा घेतला असता, स्थानिक रहिवाशांच्या हेकेखोर भूमिकेला अजिबात थारा न देण्याचे निर्देश त्यांनी जारी केले. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाºया नागरिकांविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या उद्देशातून पोलीस बंदोबस्तात जलकुंभाचे कामकाज सुरू करण्याचा आदेश आयुक्त कापडणीस यांनी दिला आहे.

...तर पाणी पुरवठ्याची समस्या दूर होईल!
आंबेडकर मैदानालगत उभारला जाणारा जलकुंभ १८ लाख लीटर क्षमतेचा आहे. या जलकुंभाच्या माध्यमातून आंबेडकर नगरचा काही भाग, खैर मोहम्मद प्लॉटसह जुने शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात पाणी पुरवठा होणार असून, यामुळे अनियमित पाणी पुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

नगरसेवकांची चुप्पी का?
एरव्ही प्रभागातील विविध समस्यांवर सभागृहात घसे कोरडे करून प्रसिद्धी लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या या प्रभागातील नगरसेवकांनी जलकुंभाच्या मुद्यावर चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे. मतांच्या समीकरणापायी जलकुंभासारख्या महत्त्वाच्या विषयावर नगरसेवकांनी तोंडावर बोट ठेवणे पसंत केल्यामुळे प्रभागातील सुज्ञ नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.


जुने शहरातील आंबेडकर मैदानाच्या जागेवर अतिक्रमकांनी कब्जा केला आहे. या ठिकाणी उभारल्या जाणाºया जलकुंभामुळे जुने शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. जलकुंभाच्या उभारणीला अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, यात दुमत नाही.
-संजय कापडणीस,
आयुक्त, मनपा.

 

Web Title: Water tank will be built at Ambedkar ground in Old City!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.