अकोल्यास पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय
By admin | Published: June 21, 2017 01:36 PM2017-06-21T13:36:35+5:302017-06-21T13:36:35+5:30
व्हॉल्व खुला केल्यामुळे महानवरून अकोला शहराला पुरवण्यात येत असलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी खुला केला मोठा व्हॉल्व
अकोला : अकोला- बार्शिटाकळी मार्गावर खडकी येथे अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील व्हॉल्व नादुरुस्त असल्यामुळे अकोला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुरूस्तीचे काम करण्यासाठी शिवापूर फाटा येथे २१ जूनच्या दुपारी १२.४५ वाजता एका हॉटेलसमोरील मोठा व्हॉल्व खुला केल्यामुळे महानवरून अकोला शहराला पुरवण्यात येत असलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे. अकोलावासियांना होणाऱ्या पाणीपुरवठयावर याचा परिणाम होणार आहे.
आकोलावासियाना महान धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. परंतु पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनी व व्हॉल्व नादुरूस्त होतात. दुरूस्तीपोटी लाखो रूपयाची देयक काढली जातात. तरी सुध्दा पाण्याची नासाडी थांबता थांबत नाही. सध्या महान धरणाची पातळी घसरली आहे. अजुन पाहीजे तसा पावसाळा सुरू झाला नाही. अशा स्थितीत दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अकोल्यापासून पाच कि.मी.अंतरावरील शिवापूर फाट्याजवळ जलवाहिनीवरील मोठा व्हॉल्व खुला केला. त्यामुळे पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे. धरणात पाणी कमी असताना पाण्याचा असा अपव्यय करण्यामुळे भविष्यात पाऊस कमी पडल्यास अकोलावासीयांवर तीव्र पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ येऊ शकते. (प्रतिनिधी)