टरबुजाला भाव मिळेना, शेतकऱ्याने शेतातच फेकले टरबूज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:11+5:302021-05-20T04:19:11+5:30
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, प्रशासनाने लॉकडाऊन लागू केले. मागील पंधरा दिवसांपासून बाजारपेठ बंद आहे. ...
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, प्रशासनाने लॉकडाऊन लागू केले. मागील पंधरा दिवसांपासून बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या टरबुजाला भाव मिळत नसल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. येथील एका शेतकऱ्याने टरबुजाला भाव मिळत नसल्याने, शेतातच टरबूज फेकल्याचा प्रकार बुधवारी समोर आला.
वाडेगाव येथील शेतकरी वसंत वक्टे यांनी त्यांच्या दीड एकर शेतात सेंद्रिय टरबूज पिकाची लागवड केली होती. या पिकाला ड्रीप, पाईप, पेपर मल्चिंग, मजुरी, बियाणे आदी मजूर मशागतसह एकूण सव्वा ते दीड लाख रुपयांचा खर्च आला आहे. परंतु लॉकडाऊनमुळे टरबुजाचे पीक बाजारपेठेत विकता आले नाही. व्यापारीसुद्धा टरबुजाची मातीमोल भावाने मागणी करीत आहेत. टरबूज पिकापासून नफा तर दूर झालेला खर्चसुद्धा निघाला नसल्याचे शेतकरी वसंत वक्टे यांनी सांगितले. व्यापारी वर्ग टरबूज पीक घ्यायला तयार नाहीत. दारोदार चिल्लर विक्री विकायला गेलो तर ६ ते ७ रुपये किलोने टरबूज मागितले जात आहे. त्यामुळे वाहनाचे भाडे, मजूर याचासुद्धा खर्च निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे वसंत वक्टे यांनी टरबुजाचा माल शेतात पडून सडत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष देऊन मदत करावी, अशी मागणी टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो:
घेता विकत की वाटू फुकट!
कोरोनामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बाजारपेठ बंद आहे. बाहेरगावी जाऊन माल विकता येत नाही. व्यापारीही टरबूज खरेदी करीत नाहीत. केले तर अत्यंत कमी दराने टरबुजाची मागणी केली जाते. त्यामुळे शेतात मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या टरबुजांचे करावे काय? ‘घेता विकत की वाटू फुकट?’ अशी वेळ आम्हा शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना माल विकण्याची परवानगी द्यावी.
मी सेंद्रिय पद्धतीने टरबूज या पिकाची लागवड केली होती. परंतु लॉकडाऊनचा फटका, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन शासनाने मदत द्यावी.
- वसंत वक्टे, शेतकरी वाडेगाव