अकोल्याचे टरबूज-खरबूजही जाणार आखाती देशात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 06:06 PM2018-11-04T18:06:16+5:302018-11-04T18:07:05+5:30
अकोला: जिल्ह्यातील केळी, डाळिंब, भेंडी, मिरचीपाठोपाठ तेल्हारा आणि पातूर तालुक्यातील टरबूज व खरबूजही आखाती देशात जाणार आहे. टरबूज आणि खरबूज निर्यातीचा निर्यातदार कंपनीसोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यातील केळी, डाळिंब, भेंडी, मिरचीपाठोपाठ तेल्हारा आणि पातूर तालुक्यातील टरबूज व खरबूजही आखाती देशात जाणार आहे. टरबूज आणि खरबूज निर्यातीचा निर्यातदार कंपनीसोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा तसेच शेतकºयांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारात जिल्ह्यातील भाजीपाला आणि फळपिकांच्या निर्यातीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने गतवर्षीपासून जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील केळी आखाती देशात निर्यात करण्यात येत आहे. त्यानंतर जिल्ह्यातील डाळिंब, भेंडी आणि मिरचीची निर्यात सुरू करण्यात आली. त्या पाठोपाठ आता जिल्ह्यातील तेल्हारा व पातूर या दोेन तालुक्यातील टरबूज आणि खरबुजाची निर्यात दुबई, अबुधाबी, बहरीन, मस्कत इत्यादी आखाती देशांत करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, ‘अपेडा’च्या पुढाकारात मोर्णा व्हॅली कंपनीचा बॉम्बे एक्सपोर्ट कंपनीसोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने आता अकोला जिल्ह्यातील टरबूज व खरबूजही आखाती देशांत जाणार आहे.
पातूर-तेल्हारा तालुक्यात १५० हेक्टरवर टरबूज-खरबुजाची लागवड!
टरबूज-खरबुजाची आखाती देशात निर्यात करण्यासाठी जिल्ह्यातील पातूर व तेल्हारा या दोन तालुक्यात १५० हेक्टर क्षेत्रावर टरबूज व खरबूज लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पातूर तालुक्यातील चान्नी, पिंपळखुटा व उमरा आणि तेल्हारा तालुक्यात चितलवाडी, हिवरखेड, दहिगाव अवताडे इत्यादी गावांत १५ नोव्हेंबरपर्यंत टरबूज व खरबुजाची लागवड करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव उपलब्ध व्हावा आणि उत्पन्न वाढावे, यासाठी जिल्ह्यातील फळे-भाजीपाला निर्यातीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील टरबूज व खरबूज निर्यातीचे नियोजन करण्यात आले आहे. निर्यातीद्वारे शेतमालाला चांगला भाव मिळणार असल्याने, त्याचा शेतकºयांना फायदा होणार आहे.
-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील केळी, डाळिंब, भेंडी व मिरचीची निर्यात आखाती देशात सुरू आहे. आता पातूर व तेल्हारा तालुक्यातील टरबूज व खरबुजाची निर्यातही आखाती देशात करण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित निर्यातदार कंपनीसोबत करारनामा करण्यात येणार आहे.
- अशोक अमानकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो)