‘व्हॅक्स’ आवरणाचा सफरचंद सुरक्षित; ‘ वॉशिंग्टन अॅपल कमिशन’चा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 02:41 PM2018-05-17T14:41:01+5:302018-05-17T14:41:01+5:30
अकोला : सफरचंदावरील व्हॅक्सचे आवरण आरोग्यासाठी धोकादायक सिद्ध होत असताना, आमचे सफरचंद व्हॅक्स आवरण सुरक्षित असल्याचा दावा वॉशिंग्टन अॅपल कमिशनने केला आहे.
- संजय खांडेकर
अकोला : सफरचंदावरील व्हॅक्सचे आवरण आरोग्यासाठी धोकादायक सिद्ध होत असताना, आमचे सफरचंद व्हॅक्स आवरण सुरक्षित असल्याचा दावा वॉशिंग्टन अॅपल कमिशनने केला आहे. वॉशिंग्टन अॅपल कमिशनचे दिल्ली येथील प्रतिनिधी राज्यातील बाजारपेठा गाठून भारत सरकारच्या राजपत्राच्या प्रती आणि भेटवस्तू वाटून वॉशिंग्टनचे सफरचंद आरोग्यासाठी अपायकारक नसल्याचे दाखले देत पटवून देत आहेत. अशीच एक चमू पंधरा दिवसाआधी दिल्लीहून अकोल्यात येऊन गेली.
दररोज एक सफरचंद खा, अन सुदृढ राहा, असा डॉक्टरांचा सल्ला असतो. त्यामुळे आजारी व्यक्ती सोबतच सुदृढ व्यक्तींही नियमित सफरचंद खातात. त्यामुळे बारामाही सफरचंदाला मोठी मागणी असते. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात सफरचंदचे उत्पादन होते. सोबतच विदेशातूनही मोठ्या प्रमाणात सफरचंद भारतात येतात. सफरचंद अधिक काळ चांगले राहावे आणि ग्राहक आकर्षणासाठी सफरचंदावर व्हॅक्सचे आवरण लावले जाते. त्यासाठी अखाद्य तेल, पेट्रोलियम आणि मोमचा सर्रास वापर होतो. सफरचंदावरून नख कोरल्यास किंवा पृष्ठभागावार चाकू कोरल्यास व्हॅक्स आढळून येते. व्हॅक्स आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाच्यावतीने कारवाया झाल्यात. त्यामुळे नागरिकांनीदेखील व्हॅक्स लावलेल्या सफरचंदाकडे पाठ फिरविली. वॉशिंग्टनच्या सफरचंदांची मागणी कमी झाल्यापासून कंपनीने भारतातील बाजारपेठांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांत जनजागृती सुरू केली आहे. कुटुंबकल्याण आणि आरोग्य मंत्रालयाच्या राजपत्राच्या प्रमाण प्रतीचे पत्रक दुकानाबाहेर लावण्याचा आग्रह हे प्रतिनिधी करीत आहेत. भारतातील आणि यूएसच्या अन्न -औषधीचे दाखलेही दिले जात आहेत. व्यापाºयांना प्रोत्सहनासाठी टी शर्ट, कॅप आणि विक्रीवर विविध योजना देत आहेत.
असे आहे ‘वॉशिंग्टन’चे नैसर्गिक ‘व्हॅक्स’
वॉशिंग्टनच्या सफरचंदाला लावून येणारे व्हॅक्स हे नैसर्गिक निर्मितीचे असून, त्याला भारत सरकारने रीतसर मान्यता दिलेली आहे. सफरचंदाला लावणारे व्हॅक्स हे मधमाशीपासून तयार होणाऱ्या मधासारखे आहे. ते आरोग्यासाठी अपायकारक नाही, असा दावा वॉशिंग्टन अॅपल कमिशने व्यापाऱ्यांना दिलेल्या पत्रकातून केला आहे.