करडी तेलबिया पीक नामशेष होण्याच्या मार्गावर, यंदा बियाणांची कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 01:51 PM2018-09-27T13:51:03+5:302018-09-27T13:52:19+5:30
सन 1999-2000 पर्यंत राज्यात करडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. परंतु, या पिकाला मिळणारे कमी दर आणि हे पीक काटेरी असल्याने काढण्यासाठी या पिकाला मजूर मिळत नाहीत.
राजरत्न सिरसाट
अकोला - करडी तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असून, विदर्भात दोन लाख हेक्टरवर असणारे करडीचे हे क्षेत्र केवळ पंधराशे हेक्टरच्या कमी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने करडी पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. पण, उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळत नसल्याने करडीचे क्षेत्र नामशेष होण्याची भिती कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
सन 1999-2000 पर्यंत राज्यात करडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. परंतु, या पिकाला मिळणारे कमी दर आणि हे पीक काटेरी असल्याने काढण्यासाठी या पिकाला मजूर मिळत नाहीत. परिणामी या पिकाचे क्षेत्र कमी होत गेले. 2011-12 पर्यंत राज्यात 1 लाख 23 हजार हेक्टर क्षेत्र होते. विदर्भात तर दोन लाख हेक्टर असलेले हे क्षेत्र याच कारणामुळे कमी झाले. आता, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात पंधराशे तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात केवळ एक हेक्टर क्षेत्र उरले आहे. अमरावती विभागाचे उत्पादन हे 2 हजार मेट्रिक टन आणि उत्पादकता 495 किलो प्रतिहेक्टर तर नागपूर विभागातील उत्पादन 325 मेट्रिक टन आणि उत्पादकता 325 किलो प्रतिहेक्टर होती. राज्यातील करडीचे हे उत्पादन 67 हजार मेट्रिक टन आणि उत्पादन 545 किलो प्रतिहेक्टरी होते. आता, गेल्या पाच वर्षांपासून विदर्भातील करडीचे क्षेत्र झपाट्याने घसरले आहे.
गुलाबी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने करडीची पिंक ही नवी जात विकसित केली आहे. हेक्टरी 15 ते 21 क्विंटल उत्पादन देणारी ही जात 130 ते 135 दिवसात परिपक्व होते. विशेष म्हणजे या करडीपासून 32 टक्के तेल मिळते. कृषी विद्यापीठाने रब्बीमध्ये या पिकाचे क्षेत्र वाढीसाठी कार्यक्रम आखला पण त्याला शेतकऱ्यांचा अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही.
केवळ 450 क्विंटल बियाणांचे नियोजन
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज)मागच्यावर्षी राज्यासाठी 900 क्विंटल करडी बियाण्यांचे नियोजन केले होते. तथापि क्षेत्रात घट झाल्याने यावर्षी संपूर्ण राज्यासाठी केवळ 450 क्विंटल नियोजन केले आहे. प्रत्यक्षात बाजारात किती आणणार हे ठरायचे आहे.
करडीला अपेक्षीत दर मिळत नसल्याने करडीचे क्षेत्र कमी झाले हे क्षेत्र वाढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
डॉ.संजय साखरे, विभाग प्रमुख,
तेलबिया, डॉ.पंदेकृवि, अकोला.