बचत गटातून साधला उन्नतीचा मार्ग!
By admin | Published: April 24, 2017 01:59 AM2017-04-24T01:59:05+5:302017-04-24T01:59:05+5:30
स्वयंरोजगाराची धरली कास: गोपालखेडच्या युवकांनी केली बेरोजगारावर मात
अतुल जयस्वाल - अकोला
गावात राहून काय करायचे, ना रोजगाराची साधने, ना शिक्षणाच्या संधी, अशी नकारात्मक भावना असलेले अनेक युवक गाव सोडून रोजगारासाठी शहराचा रस्ता धरतात. अकोला जिल्ह्यातील गोपालखेड या छोट्याशा गावातील काही युवकांनी मात्र बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन स्वयंरोजगाराची कास धरत बेरोजगारीवर मात केली आहे.
अकोल्यापासून २० कि.मी. अंतरावर गोपालखेड हे छोटेसे गाव आहे. खारपाणपट्ट्यात असलेल्या या गावाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. शेतीव्यतिरिक्त रोजगाराचे इतर कोणतेही साधन नसल्यामुळे गावातील अनेक तरुण रोजगारासाठी अकोला व इतर मोठ्या शहरांमध्ये कार्यरत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून गावातील काही सुशिक्षित तरुणांनी २००९ मध्ये एकत्र येऊन संघर्ष स्वयं सहायता बचत गटाची स्थापना केली. काही वर्षे बचत गट सुरळीत चालू राहिल्यानंतर या युवकांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची कास धरण्याचा निर्धार केला. त्यांच्या निर्धाराला साथ लाभली कृषी समृद्धी प्रकल्पाची. या प्रकल्पाद्वारे ३० टक्के अनुदान घेऊन बचत गटातील अजय मोडक, गोपाल मोडक, विजय देशमुख, अमोल पिसे व सुरेश कौलकार यांनी आपल्या हिश्शाची रक्कम भरून मागच्या वर्षी दोन लाख रुपयांत मिनी दाल मिल सुरू केला. या भागात तुरीचे उत्पादन चांगले होत असल्यामुळे त्यांच्या दाल मिलला चांगला प्रतिसाद मिळू लागला. आसपासच्या गावांमधील शेतकऱ्यांनीही बचत गटाच्या दाल मिलमधून तूर डाळ तयार करून घेण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी बचत गटाच्या मिलमध्ये ५० क्विंटल तूर डाळीवर प्रक्रिया करण्यात आली. यावर्षी आतापर्यंत जवळपास १०० क्विंटल तूर डाळीवर प्रक्रिया करण्यात आली असून, अजूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उद्योगातून बचत गट भरभराटीस आला असून, या तरुणांनी बेरोजगारीवर मात करीत रोजगार मिळविला आहे.
गुळपट्टी, शेवयांचीही विक्री
बचत गटातील सदस्यांनी गुळपट्टी आणि सेवया तयार करण्याचा गृहोद्योगही सुरू केला आहे. बचत गटातील प्रवीण मोडक, प्रफुल्ल मोडक, अजय मोडक, विजय देशमुख हे चार सदस्य २०१३ पासून सेवया तयार करीत आहेत. या सेवयांना चांगली मागणी असून, गतवर्षी त्यांनी ४० हजार रुपयांच्या मालाची विक्री केली, तसेच बचत गटातील सदस्य कृषी प्रदर्शन व इतर प्रदर्शनांमध्ये गुळपट्टीची विक्री करून बचत गटाला आर्थिक हातभार लावतात.