‘गोंधळ’ संपण्याच्या मार्गावर!
By admin | Published: October 14, 2014 01:26 AM2014-10-14T01:26:12+5:302014-10-14T01:26:12+5:30
पुरातन कला जपण्यासाठी नवी पिढी अनुत्सुक; गोंधळी समाजाच्या पुनरुज्जीवनाची गरज.
राम देशपांडे /अकोला
मंगल कार्याप्रसंगी विविध देवी-देवतांचा गोंधळ घालण्याची परंपरा संपूर्ण राज्यात विखुरलेल्या गोंधळी समाजाने जपली आहे. काळाच्या ओघात ही प्रथा सुरू ठेवण्याविषयी नवीन पिढी फारशी उत्सुक नाही. परिणामी, ही कला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणार्या या समाजातील ज्येष्ठांना पोटापाण्यासाठी इतर व्यवसायांकडे वळावे लागत आहे. हीच परिस्थिती राहिली तर, भविष्यात ही कला लोप पावते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. शूभकार्याप्रसंगी देवीची स्तुती व पूजा करून गोंधळ घालण्याची प्रथा जुन्या काळी उदयास आली. पुराणादी लेखांमध्येही या कलेचा उल्लेख आढळतो. गनिमी काव्याचा एक भाग म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळय़ांनी गोंधळी समाजाने विकसित केलेल्या ह्यकरपल्लवीह्ण या सांकेतिक भाषेचा वापर केला होता. असुरी शक्तींवर विजय मिळविण्यासाठी गोंधळ घालून दैवी शक्तीला जागृत करणारे गोंधळीबुवा सर्वज्ञात आहेत. संबळ, तुणतुणं, टाळ, डफ अशी सर्व वाद्ये घेऊन तीन-चार गोंधळींचा समूह गोंधळ घालण्यासाठी घरोघरी जातात. खंडोबा, जोतिबा, काळू आई, रेणुका अशा विविध देवी-देवतांचा जागर गोंधळींद्वारे घातला जातो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा गोंधळी समाजाने जपली असली तरी, सध्याच्या घडीला गोंधळी समाज अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहे. गोंधळाच्या माध्यमातून एकेकाळी संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या या समाजातील ज्येष्ठांना सद्यस्थितीत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत असून, नाइलाजाने इतर लहान- मोठय़ा व्यवसायांचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाने गोंधळी समाजाला भटक्या विमुक्त जमातीमध्ये समाविष्ट केले असले तरी, शासनाच्या कित्येक योजना या समाजापर्यंत अद्याप पोहोचलेल्या नाहीत. तद्वतच, या कलेतून फारसे उत्पन्नही मिळत नसल्याने, या समाजाची नवीन पिढी वडिलोपार्जित परंपरा पुढे चालवावयास तयार नाहीत. शासनाने ज्येष्ठ कलाकारांसाठी सुरू केलेल्या अनुदान योजनेपासून या समाजातील हजारो ज्येष्ठ नागरिक अद्याप वंचित आहेत. केवळ आश्वासनांचे तुणतुणे वाजविणार्या अधिकार्यांना वारंवार अर्ज, निवेदने देऊन झाली; मात्र काहीही उपयोग झाला नाही. या समाजाला मदतीच्या हाताची गरज आहे. केवळ नोकरी आणि व्यवसायामागे धावणार्या नवीन पिढीमुळे भविष्यात ह्यगोंधळह्ण कला लोप पावण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत गोंधळी समाजाचे अध्यक्ष राजू पेंढारी यांनी व्यक्त केले.