भाजपच्या ‘विजया’चा मार्ग मोकळा
By admin | Published: March 12, 2016 02:38 AM2016-03-12T02:38:34+5:302016-03-12T02:38:34+5:30
मतदानापूर्वीच काँग्रेस-भारिपमध्ये बिनसले; स्थायीच्या सभापती पदासाठी भाजप, काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज सादर.
आशीष गावंडे / अकोला
स्थायी समितीच्या सभापती पदासाठी दंड थोपटणार्या काँग्रेस व भारिप-बहुजन महासंघाची हवा चक्क मतदानापूर्वीच गूल झाली. सभापती पदासाठी शुक्रवारी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने काँग्रेसचे अब्दुल जब्बार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. या निवडणुकीत ऐन वेळेवर भारिप-बमसंने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने भाजपच्या ह्यविजयाह्णचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र समोर आले.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया १२ मार्च रोजी (शनिवार) मनपाच्या मुख्य सभागृहात पार पडेल. सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीच्या वतीने शुक्रवारी विजय अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पूर्वसंध्येला सत्तापक्षाच्या उमेदवाराला कडवे आव्हान देणार असल्याचे सांगत विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघाने एकत्र येऊन दंड थोपटले होते. स्थायी समितीच्या सोळा सदस्यीय समितीमध्ये सत्ताधारी भाजप-सेनेच्या बाजूने आठ सदस्य तसेच विरोधी पक्ष काँग्रेस आघाडीच्या बाजूनेसुद्धा आठ सदस्य असल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होईल, ही अपेक्षा होती. दोन्ही पक्षाकडे समान संख्याबळ असल्यामुळे काँग्रेस व भारिपने सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या दालनात ११ मार्च रोजी काँग्रेस, राकाँ व भारिपच्या गटनेत्यांची बैठकसुद्धा पार पडली. या बैठकीत आठ सदस्यांच्या बळावर काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज सादर करण्यावर निर्णय झाला होता. तर विजयासाठी भारिपने एक सदस्य शिल्लक मिळवल्यास भारिपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. राजकीय सारिपाटावरील समीकरणांची चक्रे वेगाने फिरताच भारिप-बमसंने उमेदवारी अर्ज सादर करणे तर सोडाच चक्क निवडणुकीत भाग न घेता तटस्थ राहणार असल्याची भूमिका गटनेता गजानन गवई यांनी शुक्रवारी स्पष्ट केल्याने या निवडणुकीत काँग्रेस-राकाँ एकाकी पडल्याचे चित्र समोर आले आहे.