बालकांच्या जागरूकतेसाठी 'आम्ही बालस्नेही' पाेस्टर्स मालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 10:32 AM2021-08-08T10:32:36+5:302021-08-08T10:32:46+5:30
We are child-friendly : १५ ऑगस्टपासून बालकांच्या जागरूकतेसाठी आही बालस्नेही पाेस्टर्स मालिका हा अनाेखा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
- सचिन राउत
अकाेला : विदर्भातील पहिले बालस्नेही पाेलीस स्टेशन अकाेल्यातील सिव्हील लाइन्स पाेलीस ठाण्यात कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे अकाेला पाेलीस दल व मुंबई येथील विधायक भारती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्टपासून बालकांच्या जागरूकतेसाठी आही बालस्नेही पाेस्टर्स मालिका हा अनाेखा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी विविध व्हाॅट्सॲप ग्रुपही तयार करण्यात आले असून, जनजागृती अधिक प्रमाणात व्हावी यासाठी पाेलीस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुलांवर हाेणारे अत्याचार राेखण्यासाठी तसेच मुलांना कायद्याचे ज्ञान व्हावे या उद्देशाने पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून बालस्नेही पाेस्टर्स मालिका १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. मुलांची सुरक्षितता, त्यांना कायदेविषयक माहिती, त्यांचे अधिकार व कर्तव्ये या सर्व बाबतीत सखाेल मार्गदर्शन बालकांना करण्यात येणार आहे. आम्ही बालस्नेही या माध्यमातून प्रत्येक मुलापर्यंत पाेहाेचण्याचा प्रयत्न अकाेला पाेलिसांनी सुरू केला असून, त्यानंतर मुलांना विविध आकर्षक पाेस्टर्सच्या माध्यमातून ही पाेस्टर्स मालिका सुरू करण्यात येणार आहे. केवळ अकाेलाच नव्हे, तर राज्यातील विविध जिल्ह्यांतील बालकांनाही या पाेस्टर्स मालिकेमध्ये सहभागी करून त्यांना छंद वाटेल अशा क्लिप्स व पाेस्टर्सच्या माध्यमातून ज्ञान देण्यात येणार आहे.
या वयाेगटातील बालकांचा समावेश
बालस्नेही पाेलीस स्टेशनअंतर्गत ० ते १८ वर्षे वयाेगटातील बालकांना कायदेविषयक माहिती देण्यात येते. त्यामुळे या वयाेगटातील मुलांना पाेस्टर्स मालिकेद्वारे जागरूक करण्यात येणार आहे. यामध्ये मुलगा, मुलगी असा लिंगभेद नसून, प्रत्येकाला लैंगिक छळाच्या विराेधापासून ते कायदेविषयक माहिती देण्यात येणार आहे.
३६५ दिवस चालणार उपक्रम
राज्यातील पहिलाच उपक्रम अकाेला पाेलीस प्रशासनाने सुरू केला असून, १५ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या एका वर्षातील ३६५ दिवस पाेस्टर्स मालिकेचा उपक्रम चालणार आहे. फेसबुक, ट्विटर, व्हाॅट्सॲप यासह विविध साेशल मीडियाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी मुंबई येथील विधायक भारती ही संस्था मदत करणार असून, ही संस्था बालकांच्या लैंगिक छळाविराेधात राज्यभर काम करीत आहे. त्यामुळे याच संस्थेला साेबत घेऊन बालकांना कायदेविषयक ज्ञान व माहिती देण्यात येणार आहे.
बालकांना कायद्याचे ज्ञान व्हावे, त्यांच्यात जनजागृती व्हावी, गुड टच, बॅड टच याचे आकलन मुलींना व्हावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येकाने या उपक्रमाची माहिती ठेवावी. त्यामुळे मुले व मुली जागरूक हाेतील आणि अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतील.
जी. श्रीधर
पाेलीस अधीक्षक अकाेला