आम्हाला पाणी पाहिजे; गांधीग्रामच्या महिलांचा आक्रोश!
By संतोष येलकर | Published: April 24, 2023 06:21 PM2023-04-24T18:21:25+5:302023-04-24T18:21:38+5:30
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येतो.
अकोला : खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गेल्या महिनाभरापासून गावाला पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे ‘आम्हाला पाणी पाहीजे ’ असा आक्रोश करीत, गांधीग्राम येथील महिलांनी सोमवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीइओ) कार्यालयात हंडा मोर्चा काढला. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र पाणीपुरवठा योजनेचे ट्रान्सफार्मर जळाल्याने आणि जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात लिकेजेस असल्याने, गेल्या एक महिन्यापासून ( २५ मार्च) गावाला अद्याप पाणीपुरवठा करण्यात आला नाही.
महिनाभरापासून नळ योजनेचे पाणी मिळाले नसल्याने, ग्रामस्थांना पूर्णा नदीतील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. तसेच जनावरांनाही पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे गावाला तातडीने पाणीपुरवठा सुरु करुन, किमान आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा आणि पूर्णा नदीचे पाणी दूषित होवू नये, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी करीत २४ एप्रिल रोजी गांधीग्राम येथील महिलांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढला. डोक्यावर रिकामे हंडा घेवून आलेल्या महिलांनी ‘आम्हाला पाणी पाहीज’ अशा घोषणा देत गावात तातडीने पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी केली. या मोर्चात गांधीग्राम येथील सरपंच सुषमा ठाकरे यांच्यासह कुसुम पाटील, कल्पना निचळे, सुलोचना गावंडे, शोभा अढाऊ, सुवर्णा फुरसुले, सुमन इंगळे, अनिता हिंगणकर, सुवर्णा गावंडे, छाया मोहिते, दिपाली अढाऊ, पुष्पा अढाऊ, लता धुरेराव, मालू सदांशिव, प्रतिभा इंगळे, शरद ठाकरे, नरेंद्र सदांशिव, सदानंद ढोकणे, महादेव गवइ, गजानन अढाऊ आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मंगळवारी मिळणार गावाला पाणी; ‘सीइओं’चे आश्वासन
गांधीग्राम येथील सरपंच सुषमा ठाकरे यांच्या नेतृत्वात महिलांच्या शिष्टमंडळाने गावातील पाणी प्रश्नावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्याशी चर्चा केली. महिनाभरापासून बंद असलेला गावातील पाणीपुरवठा तातडीने सुरु करुन, आठवड्यातून किमान आठ दिवसाआड पाणी देण्याची मागणी केली. त्यानुषंगाने मंगळवार,२५ एप्रिल रोजी गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येणार असून, पंधरा दिवसाआड गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी महिलांच्या शिष्टमंडळास दिले.