आरोग्य सेवेच्या माध्यमातून देशसेवा पूर्ण करून स्वप्नपूर्ती साध्य करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:55 AM2021-01-08T04:55:59+5:302021-01-08T04:55:59+5:30
वडिलांच्या सैन्यातील देशसेवेचा आदर्श तेल्हारा : ‘शिकाल तर टिकाल’ या महामानवांच्या उक्तीला डोळ्यासमोर ठेवून आई-वडिलांची स्वप्नपूर्ती व ठरविलेले ध्येय ...
वडिलांच्या सैन्यातील देशसेवेचा आदर्श
तेल्हारा : ‘शिकाल तर टिकाल’ या महामानवांच्या उक्तीला डोळ्यासमोर ठेवून आई-वडिलांची स्वप्नपूर्ती व ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करू पाहणाऱ्या तेल्हारा शहरातील गायत्रीनगरमधील व सध्या देशसेवेत सेवाव्रत असलेल्या रामराव श्यामराव आढाव यांचा मुलगा जयकुमार आढाव याने कठीण परिस्थितीचा सामना करून अकोला येथील मिग्ज कोचिंग क्लासेसच्या मार्गदर्शनाखाली निट परीक्षेत घवघवीत यश मिळवून एम.बी.बी.एस.साठी शासकीय कोट्यात येऊन वडिलांची देशसेवा आपल्या हातून आरोग्य सेवेतून करण्याचा निश्चय करून आई-वडिलांची स्वप्नपूर्ती करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
शिक्षणाचे महत्त्व समजून प्रत्येक पालक हे आपल्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर लक्ष देऊन त्यांना उच्च पदावरील अधिकारी किंवा डॉक्टर, इंजिनीअर व्हावे असे वाटते. तसेच काहीसे स्वप्न तेल्हारा येथील गायत्रीनगर येथे वास्तव्याला असलेले सैनिक सेवेत बंगालमधील खडकपूर येथे असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून सेवेत असलेले रामराव श्यामराव आढाव व त्यांची पत्नी गृहिणी वंदना यांनी पाहिले. भूमिहीन कुटुंबातील रामराव यांना हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करता न आल्याने भारतीय सैनिक सेवेत भरती व्हावे लागले. वडिलांची शैक्षणिक स्वप्नपूर्ती आपण पूर्ण करू, असा ठाम निश्चय बाळगून जयकुमार यांनी प्राथमिक शिक्षणापासूनच पक्की गाठ बांधली व आपल्या उचित ध्येयाकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली. जयकुमारचे पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण दर्यापूर येथे झाले, तेसुद्धा कठीण परिस्थितीत. दररोज पहाटे पाच वाजता उठून म्हैसांगवरून दर्यापूर येथे वीस किमी प्रवास आपल्या आई आजीच्या मदतीने पूर्ण करून शिक्षण केले. त्यानंतर तेल्हारा येथे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण करून दहावीत ९५ टक्के व बारावीत ७५ टक्के गुण मिळवून एमबीबीएस डॉक्टर व्हायचे लक्ष ठेवून निट परीक्षेची तयारी सुरू केली. या दरम्यान रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून अभ्यास केला, तुम्ही जर तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिले, तर ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. जीवनामध्ये अशक्य असे काही नाही, ते करण्याची जिद्द चिकाटी आणि संधी महत्त्वाची असते हा मिग्ज कोचिंग क्लासेसमध्ये दाखल होताना अजय देशपांडे व राजेश जोध सरांनी दिलेला उपदेश समोर ठेवून सरांच्या मार्गदर्शनाखाली दररोज अभ्यास केला. देशपांडे सर मला रोज सकाळी ५ वाजता अभ्यासाला उठवायचे. आम्ही खूपदा लायब्ररीमध्ये रात्री ११ वाजेपर्यंत अभ्यास करायचो, तेव्हा देशपांडे सर, जोध सरसुद्धा आमच्या शंका निरसन करण्यासाठी तेथेच थांबायचे. देशपांडे सरांचे सकारात्मकताबद्दल असलेले विचार मी खूप आवर्जून सांगू इच्छितो की, त्याचा माझ्या यशात खूप मोठा वाटा आहे. मिग्ज क्लासेसमध्ये झालेल्या सर्व टेस्ट या तंतोतंत एन.सी.ई.आर.टी.च्या पुस्तकाला अनुसरून असतात, त्याचाही मला खूप फायदा झाला. यशस्वी माणसाच्या मागे कुणाचा तरी हात लागतो त्याप्रमाणे माझ्यावर सरांच्या विचारांचा व मार्गदर्शनाचा हात पडला, तो शाबासकी मिळवून मी सार्थ ठरवला त्याचा मला अभिमान आहे. मला निट परीक्षेत ५१६ गुण मिळाले. पहिल्याच फेरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे प्रवेश मिळाला.
माझे वडील देशसेवेत असल्याने तोही फायदा मला झाला असला तरी सरांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व आई-वडिलांचे कष्ट यामुळे मला यश मिळाले. ही यशाची पताका पुढे ठेवून वडिलांची सैन्यातील देशसेवा, माझी आरोग्यसेवा अखंड सुरू ठेवून देशाप्रति प्रामाणिक सेवाव्रत राहीन, हे जयकुमार आढाव याचे शब्द भविष्याची नांदी ठरतील असे आहेत.