आम्ही नाही सुधरणार... दुसऱ्या दिवशीही ८१ मनपा कर्मचारी ‘लेट लतिफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 11:20 AM2020-10-16T11:20:19+5:302020-10-16T11:22:16+5:30
Akola Municipal Corporation दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेल्या झाडाझडतीमध्ये ८१ कर्मचारी ‘लेट लतिफ’ आढळले.
; ८१ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात
अकोला : महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी कामांबाबत बेफिकीर झाले होते. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी बुधवारी विभागनिहाय झाडाझडती घेत कर्मचाऱ्यांची पडताळणी केली असता, तब्बल १४७ कर्मचारी ‘लेट लतिफ’ आढळले. या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापले जाणार आहे. एवढी माेठी कारवाई हाेऊनही अनेक कर्मचाऱ्यांची, ‘आम्ही सुधरणार नाही’, ही वृत्ती कायम असल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले. दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेल्या झाडाझडतीमध्ये ८१ कर्मचारी ‘लेट लतिफ’ आढळले. त्यांचेही वेतन कापले जाणार आहे.
आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये मनपा कार्यालयांच्या हजेरी रजिस्टरांची तपासणी केली असता, त्यामध्ये एकूण ८१ कर्मचारी गैरहजर असलेले आढळून आले. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील ४, लेखा विभागातील ६, माहिती अधिकार कक्ष १, जलप्रदाय विभागाचे ८, आवक-जावक विभागाचा १, विद्युत विभागातील २३, शिक्षण ५, आरोग्य (स्वच्छता) विभागातील ५, संगणक विभागातील १, जन्म-मृत्यू विभागातील २, नगरसचिव विभागातील ६, नगररचना विभागातील ११, टेलिफोन विभागाचे २, बांधकाम विभागाचे ६, असे एकूण ८१ कर्मचारी आहेत. या सर्वांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे.