लग्नाचा खर्च करावा लागणार नाही; आई वडिलांची मागितली माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:18 AM2021-03-14T04:18:37+5:302021-03-14T04:18:37+5:30
युवतीच्या जळालेल्या मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्ठीत उल्लेख अकोला : यावलखेड परिसरात युवतीचा जळालेला मृतदेह आढळला. पोलिसांनी या ठिकाणी शोध मोहीम ...
युवतीच्या जळालेल्या मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्ठीत उल्लेख
अकोला : यावलखेड परिसरात युवतीचा जळालेला मृतदेह आढळला. पोलिसांनी या ठिकाणी शोध मोहीम राबविली असता मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्ठीत युवतीने आई-वडिलांना आता लग्नाचा खर्च करावा लागणार नसल्याचे नमूद करीत त्यांची माफी मागत आत्महत्या करीत असल्याचे मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. यावरून युवतीच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून या चिठ्ठीतील हस्ताक्षर तपासल्यानंतर ही आत्महत्या आहे की घातपात याचा उलगडा होणार आहे.
निंबी मालोकार येथील रहिवासी श्रीकृष्ण देवर हे मुलगी व मुलाच्या शिक्षणासाठी गाव सोडून डाबकी रोड वर भाड्याने राहत आहेत. श्रीकृष्ण देवर हे ऑटोचालक असून ऑटो चालून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. अशातच श्रीकृष्ण देवर व त्यांच्या पत्नीला मुलगी समीक्षाच्या लग्नाची चिंता लागली होती. कोरोनाचे संकट आल्यानंतर मार्च २०२० पासून ऑटोचा व्यवसायही पूर्णता खोळंबल्याने आता मुलीच्या लग्नाचा खर्च कसा भागवणार यासाठी देवर दांपत्यामध्ये चर्चा होती. ही चर्चा समीक्षा देवर हिच्या कानावर गेल्याने तिने स्वतःवर रॉकेल ओतून जाळून घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळावर होती. तेवढ्यातच पोलिसांनाही घटनास्थळावर एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत समीक्षाने आईवडिलांची माफी मागितली. तसेच आई-वडिलांना उद्देशून आता तुम्हाला माझ्या लग्नाचा खर्च करावा लागणार नसल्याचेही नमूद केले. यावरून हळव्या मनाची असलेल्या समीक्षाने आई-वडिलांची चिंता दूर करण्यासाठी स्वतः आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तिने रॉकेलही शहरातून खरेदी करून सायकलने यावलखेड गाठून त्या परिसरात जाळून घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र या प्रकरणाचा तपास बोरगाव मंजू पोलिसांनी सुरू केला असून तपासानंतर तसेच चिठ्ठीतील हस्ताक्षर हस्ताक्षर तज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच या आत्महत्येचे किंवा घातपाताचे खरे कारण समोर येणार आहे.