जिल्ह्यात गुरांचा आठवडी बाजार सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:04+5:302021-09-04T04:24:04+5:30
अकोला: शेतकऱ्यांच्या कामाची निकड लक्षात घेता, गुरांचा आठवडी बाजार सुरू करणे आवश्यक असल्याने, जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार ...
अकोला: शेतकऱ्यांच्या कामाची निकड लक्षात घेता, गुरांचा आठवडी बाजार सुरू करणे आवश्यक असल्याने, जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी निश्चित केलेल्या दिवशी गुरांचा आठवडी बाजार अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शुक्रवारी दिला.
जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामीण स्तरावरील नियमित भरविण्यात येणारा गुरांचा आठवडी बाजार नेमून दिलेल्या दिवशी नियमित भरणार आहे, गुरांच्या आठवडी बाजारामध्ये गर्दी होणार नाही, यासंबंधीचे नियोजन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी करावयाचे आहे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी क्षेत्राकरिता संबंधित नगरपालिका मुख्याधिकारी, ग्रामीण क्षेत्राकरिता संबंधित तहसीलदार व ग्रामपंचायत सचिवांनी याबाबत सहकार्य करावयाचे आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात गुरांच्या आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांना मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. बाजारात मास्कचा वापर अनिवार्य असून, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजाराच्या ठिकाणी साफसफाई करून, वेळत निर्जंतुकीकरण करण्यात यावे, गुरांच्या आठवडी बाजारात गर्दी होणार नाही, याकरिता गर्दीचे विकेंद्रीकरण करून अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशात देण्यात आले.