शिवजयंती उत्सवानिमित्त सप्ताहभर कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:20 AM2021-02-11T04:20:13+5:302021-02-11T04:20:13+5:30
अकोला: सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने होत असून शिवजयंती निमित्त सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले असून शिवाजी ...
अकोला: सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने होत असून शिवजयंती निमित्त सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले असून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर करणाऱ्या अनेक स्पर्धा हाेणार आहेत. शिवजयंती दिनी शहरातील सर्व शिवप्रतिमांचे पूजन करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश उर्फ भय्यासाहेब देशमुख यांनी समितीच्या वतीने बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष पवन महल्ले, सचिव चंद्रकांत झटाले, शोभायात्रा प्रमुख पंकज जायले, विजय कौसल, प्रा.इसहाक राही, सरफराज खान, मोहम्मद जाकीर, पूजा काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ फेब्रुवारीपासून या जयंती उत्सवाला प्रारंभ हाेणार असून दिनांक १९ फेब्रुवारीपर्यंत अनेक शौर्यात्मक व शिवकालीन, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात १२ रोजी शिवाजी महाविद्यालय येथे वक्तृत्व स्पर्धा , १३ ला शाळा व महाविद्यालयात निबंध स्पर्धा तसेच १३ ते १८ पर्यंत विविध विद्यालयात व्याख्यानमाला आयाेजित केली आहे. १४ फेब्रुवारी राेजी सहकारनगर येथील शिवस्मारक परिसरात चित्रकला स्पर्धा, शिवाजी महाराज पार्क येथे आरोग्य तपासणी शिबिर तर १५ ते १७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यस्तरीय वाल पेंटिंग स्पर्धा होत असून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
१५ राेजी स्थानीय असदगड किल्ला येथे ११ वर्षाच्या खालील बालकांकरिता बाल शिवाजी वेशभूषा स्पर्धा होणार असून १७ रोजी संध्याकाळी स्वराज्य भवन परिसरात १५० पेक्षा जास्त कलाकारांचे भव्य शिवसृष्टी महानाट्य व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .१८ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे किल्ले बांधणी स्पर्धा दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रांगोळी स्पर्धा आयाेजित केली आहे.
बाॅक्स
मशाल यात्रा अन् मिरवणूक
१८ रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून महानगरात भव्य मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. मुख्य जयंती सोहळा १९ रोजी भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून हा उपक्रम मराठा सेवा मंडळ साकार करणार आहे. सकाळी १० वाजता अनेक कलाकारांच्या वतीने पोवाडे व शिव गीत स्पर्धा होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दि.१७ ते १९ पर्यंत शिवकालीन नाणे व दोनशे राष्ट्रातील चलनांचे प्रदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे सप्ताहात छत्रपती शिवराय शॉर्ट फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे
काेट
छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांच्या अस्मितेचे अन् अभिमानाचे प्रतीक आहे. हा जयंती उत्सव शांततेते आणि उत्साहात साजरा करण्याचे नियाेजन आहे. सध्या जिल्हाभर अनेक आंदाेलने हाेत आहेत, त्यांना कुठल्याही परवानगीची अडचण आली नाही. त्यामुळे या उत्सवासाठी काेणतीही अडचण येणार नाही. नियाेजन समिती पूर्ण काळजी घेत आहे.
अविनाश देशमुख, अध्यक्ष, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती