अहमदाबाद- हावडा दरम्यान साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 06:29 PM2021-06-08T18:29:12+5:302021-06-08T18:29:22+5:30
Weekly special trains between Ahmedabad and Howrah : या गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावरही थांबा देण्यात आल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.
अकोला : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पूर्णतः आरक्षित दोन अतिजलद विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एकदा धावणार्या या गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावरही थांबा देण्यात आल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ कार्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, ०२४११ अहमदाबाद - हावडा ही विशेष गाडी अहमदाबाद येथून ९ जून ते ३० जून या कालावधीत सायंकाळी १६.३० वाजता सुटेल आणि हावडा येथे तिसऱ्या दिवशी ०५.१५ वाजता पोहोचेल.
०२४१२ हावडा - अहमदाबाद ही विशेष गाडी हावडा येथुन ७ जून ते २८ जून या कालावधीत दुपारी १४.३५ वाजता सुटेल आणि अहमदाबाद येथे तिसऱ्या दिवशी ००.२० वाजता पोहोचेल.
या गाड्यांना नडियाद, आनंद, वडोदरा, सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा,नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राऊलकेला, चक्रधरपूर , टाटानगर, खरगपूर या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.