वजनात अशीही बनवाबनवी!
By admin | Published: October 14, 2016 02:12 AM2016-10-14T02:12:48+5:302016-10-14T02:12:48+5:30
ग्राहकांनो, जागे व्हा; स्नॅक्स पाऊचमध्ये छापील वजनापेक्षा कमी वजनाचे पदार्थ.
अकोला, दि. १३- नामांकित कंपन्यांची अनेक प्रकारची खाद्यपदार्थांंची पाकिटे दुकानांवर मिळतात; परंतु या पाकिटांवर दिलेले वजन आणि पाकिटात असलेल्या खाद्यपदार्थांंंच्या वजनात तूट असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी दिसून आला. लोकमत चमूने काही नामांकित आणि प्रचलित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांंंची पाकिटे दुकानावरून घेतली आणि पाकिटांमधील खाद्यपदार्थ दुकानातील इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजली. प्रत्यक्षात अनेक पाकिटांमध्ये खाद्यपदार्थांंंचे वजन कमी असल्याचे दिसून आले. एका किलोमागे ग्राहकांची किती लुबाडणूक या कंपन्यांकडून होत असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमत चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशमधून उघडकीस आला. कंपन्यांकडून ग्राहकांसोबत कशी बनवाबनवी केली जाते, हेच यातून स्पष्ट झाले.
आपल्याकडून वस्तू खरेदी करणारा ग्राहक म्हणजे राजा; मात्र या ग्राहक राजाची सर्रास फसवणूक केली होते. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी प्रत्येकाला कोणत्या तरी व्यापारी, कंपन्यांकडून खरेदी करावी लागते. खरेदी केलेल्या वस्तू अनेकदा खराब निघतात किंवा वजनात तूट तरी दिसून येते. वस्तू खरेदी करताना आपण उत्पादनाची एक्सपायरी डेट, वजन तपासून पाहिले का, पदार्थात भेसळ आढळली का आणि आढळल्यास तक्रार करतो का, याचे उत्तर शेकडो ग्राहकांकडून नकारार्थीच येईल. दुकानातून वस्तू, खाद्यपदार्थ घेताना, ग्राहक त्यावरील केवळ एक्सपायरी डेट पाहतो; परंतु वस्तू, खाद्यपदार्थाचे वजन कधीच पाहत नाही. नामांकित कंपन्याची नावे पाहून तो डोळे मिटून खाद्यपदार्थांंंची पाकिटे विकत घेतो. ग्राहक वजन विचारत नसल्याने, कंपन्यांनी ग्राहकांसोबत सर्रास बनवाबनवी सुरू केली आहे. कंपन्यांची ही बनवाबनवी ग्राहकराजासमोर उघड व्हावी. या दृष्टिकोनातून लोकमत चमूने शुक्रवारी स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंगदरम्यान इलेक्ट्रॉनिक काट्यावर खाद्यपदार्थांंंचे पाकिटांचे वजन मोजले असता, बर्याच पाकिटांमधील खाद्यपदार्थ आणि पाकिटावरील छापील वजनात मोठी तूट दिसून आली. २५ ग्रॅम, ५0 ग्रॅम खाद्यपदार्थांंंच्या वजनाचा हिशोब केल्यास किलोमागे २५ ते ४ 0 ग्रॅमची तूट आढळून येते. छापील वजनाची बनवाबनवी करून कंपन्या ग्राहकांची कशी फसवणूक करीत आहेत. हे यातून साफ उघड झाले.
लाचखोर आरोग्य निरीक्षक निलंबित!
अकोला : शौचालय बांधकामाच्या अनुदानासाठी सकारात्मक अहवाल पाठविण्यास अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारणारा मनपाचा लाचखोर आरोग्य निरीक्षक रोशन अली याला निलंबित करण्याची कारवाई गुरुवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी केली. आयुक्तांच्या तडकाफडकी निर्णयामुळे कामचुकार आरोग्य निरीक्षकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
गंगा नगरातील रहिवासी रोशन अली रज्जाक अली हा मनपामध्ये आरोग्य निरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्याने शौचालय बांधकामाच्या अनुदानासाठी अनुकूल अहवाल पाठविण्यास घर मालकास अडीच हजार रुपयांची लाच मागितली. १0 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंध पथकाने त्याला लाच स्वीकारताना अटक केली.
११ ऑक्टोबर रोजी रोशन अली याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मनपा आयुक्त अजय लहाने यांनी रोशन अली याला निलंबित केले.
न्यायालयातून जामीन नाही
रोशन अली याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर गुरुवारी प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली; परंतु न्यायालयाने जामिनावर अद्यापपर्यंंंत निर्णय दिला नाही, हे विशेष.