पहिल्या पिकाचे नाचगाण्याने स्वागत
By admin | Published: April 12, 2016 01:29 AM2016-04-12T01:29:55+5:302016-04-12T01:29:55+5:30
खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर येथे तीन दशकानंतर झाली बागायती शेती.
खामगाव (जि. बुलडाणा): खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर येथे तब्बल ३२ वर्षांनंतर यावर्षी पहिल्यादांच सिंचन करून बागायती शेती करण्यात आली. या पहिल्या पिकाचे येथील शेतकर्यांनी बंजारा शैलीत नाचगाण्याने स्वागत केले.
मन प्रकल्पामुळे पिंप्री धनगर येथील अनेक शेतकर्यांची बागायती शेती गेली होती. १९८७-८८ साली या गावाचे पुनर्वसन माळरानावर करण्यात आले. प्रकल्पामध्ये शेती गेल्याने अनेकांवर बेरोजगारांची कुर्हाड कोसळली होती. प्रकल्पासाठी शेती गेली, पण शेतीसाठी प्रकल्पाचे पाणीही मिळत नसल्याने शेतकर्यांनी तब्बल तीन दशकं लढा दिला. यावर्षी पहिल्यादांच जलाशयाचे पाणी मिळाल्याने शेतकर्यांनी कांदा, भुईमुग आणि इतर पिके घेतली. त्यापैकी काही पिकं हाती आल्यानंतर या शेतकर्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बंजाराबहुल लोकवस्ती असलेल्या या गावात पहिल्या पिकाचे शेतकर्यांनी वाजत-गाजत उत्साहात स्वागत केले. पाण्यासाठी दिलेल्या लढय़ामध्ये मदत करणार्या प्रत्येक व्यक्तीचा यावेळी गावकर्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता आर.एस.जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवेंद्र देशमुख, सुनील जाधव, प्रतापराव राठोड, तेजराव नहार, संतोष राठोड, सरपंच आशाताई जाधव यांचाही सत्कार यावेळी गावकर्यांच्यावतीने करण्यात आला.