शाब्बास मुलींनो, यंदाही निकालात मुलीच पुढे जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के
By नितिन गव्हाळे | Published: May 27, 2024 03:03 PM2024-05-27T15:03:20+5:302024-05-27T15:05:05+5:30
दहावी परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २५ हजार ३२५ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार १०९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यंदा १२१ परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यंदाही जिल्ह्याचा नेत्रदीपक असा निकाल लागला आहे.
अकोला : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी २७ मे रोजी रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला. अकोला जिल्ह्याचा दहावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. यंदाचा एकूण निकाल ९६.४५ टक्के लागला असून, यंदाही दहावी परीक्षेत अपेक्षेप्रमाणे मुलींनीच आघाडी मिळवली आहे. गतवर्षी मुलांची टक्केवारी ९०.५५ होती. यंदा मात्र, त्यात पाच टक्क्यांनी घसघशीत वाढ झाली आहे.
दहावी परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २५ हजार ३२५ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार १०९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यंदा १२१ परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यंदाही जिल्ह्याचा नेत्रदीपक असा निकाल लागला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मुलांचा निकाल ९५.१७ टक्के, तर मुलींचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे. २५ हजार १०९ विद्यार्थ्यांपैकी तब्बल २४ हजार २१९ विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. १३ हजार ६६ मुलांपैकी १२ हजार ४३६ मुले उत्तीर्ण झाली, तर १२ हजार ४३ मुलींपैकी ११ हजार ७८३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
दहावी परीक्षेत केवळ ८९० विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आहेत. सकाळपासून दहावीच्या निकालाची विद्यार्थी व पालकांना प्रतीक्षा होती. एकंदरीतच निकालाचे चित्र समाधानकारक आहे.
मुलींसोबतच मुलांचीही टक्केवारी वाढली
गतवर्षी मुलांची टक्केवारी ९०.५५, तर मुलींची ९८.२४ टक्के एवढी होती; परंतु या टक्केवारी यंदा समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. झाली असून, यंदाच्या निकालात मुलांची टक्केवारी ९०.५५ टक्क्यांवरून ९५.१७ टक्क्यांवर पोहोचली आहे. मुलींची टक्केवारी ९५.८६ वरून ९७,८४ टक्क्यांवर गेली आहे. यंदा १३ हजार ६६ मुलांपैकी फक्त ६३० मुले नापास झाली आहेत, तर १२ हजार ४३ मुलींपैकी केवळ २६० मुली नापास झाल्या आहेत.
असा आहे, अकोला जिल्ह्याचा निकाल
तालुका मुले मुली एकूण टक्केवारी
अकोला ४६२९ ४६९७ ९६.०२
अकोट १६४४ १६३० ९६.५४
तेल्हारा ११८४ ११२३ ९४.५१
बार्शीटाकळी १०५० ९२० ९७.३८
बाळापूर १५७६ १५४० ९७.४३
पातूर १०८१ ८५० ९८.६२
मूर्तिजापूर १२७२ १०२३ ९६.१८