म्हणे, तुम्हीच सांगा कोणती विकास कामं हवीत?
By Admin | Published: September 15, 2014 01:58 AM2014-09-15T01:58:59+5:302014-09-15T01:58:59+5:30
भाजप मागविणार मतदारांकडूनच विकासनामा
अकोला- दीड दशकांपासून अकोला शहराचे प्रतिनिधित्त्व करणार्या भारतीय जनता पक्षाने मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये कोण ती विकास कामं हवीत याबाबत जनतेची मतं जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना एवढय़ा वर्षांत जिल्ह्यातील समस्याही जाणून घेता आल्या नाही, ते समस्या कसे सोडवतील, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसोबतच सर्वच पक्षांकडून आता मतदारांना आकर्षित करण्याचे नव-नवीन फंडे शोधले जात आहे. त्यात भाजपही मागे नाही. अकोला जिल्ह्यात दोन आमदार आणि एक खासदार असलेल्या भाजपचा मित्र पक्ष, शिवसेनेचाही एक आमदार आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात तर १५ वर्षांपासून भाजपचा आमदार आहे. दहा वर्षांपासून भाजपचे खासदार आहेत. मूर्तिजापूर या मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. असे असतानाही आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपतर्फे पाचही मतदारसंघांचा ह्यविकासनामाह्ण जाहीर केला जाणार आहे. त्यासाठी भाजप कार्यालयाने मतदारांनाकडून त्यांच्या परिसरातील समस्यांची माहिती मागविली आहे. विकास कसा करावा, यासाठी मतदारांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. जनतेकडून येणार्या सूचना आणि अपेक्षा नोंदवून घेण्यासाठी भाजप कार्यालयात पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली नाही. हा सर्व खटाखोट निवडणुकीची घोषणा झाल्यावर सुरू करण्यात आला आहे. भाजपच्या उमेदवारांना जिल्ह्यातील समस्या आणि येथे कोणता विकास हवा याची साधी माहितीही दीड दशकात करून घेता आली नाही, त्या लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील समस्या विधानसभेत कशा मांडल्या असतील आणि ते सोडवून घेण्यासाठी किती प्रयत्न केले असतील हे यानिमित्ताने स्पष्ट होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. अकोला शहारातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील जनता मुलभूत सुविधांपासून वंचित आहे, हे कुणी सांगण्याची गरज नाही. विकास कामांची पाटी कोरी असताना, ह्य तुम्हाला कोणता विकास हवाह्ण, हे जनतेकडूनच जाणून घेण्यात कोणते लोकाभिमूख काम भाजपकडून होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.