पाच-सहा दिवसात मान्सून पोहोचणार पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:37 PM2018-06-19T14:37:28+5:302018-06-19T14:37:28+5:30
आता सार्वत्रिक पावसासाठीचे वातावरण अनुकूल होत असून, २२ व २३ रोजी नैर्ऋत्य तर २५ ते २८ पर्यंत पूर्व किनारपट्टीकडून पावसाचे आगमन होणार आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला: यावर्षी हवामान शास्त्र विभागाच्या सर्वच अंदाजाला हुलकावणी देत राज्यात सार्वत्रिक पावसाचे आगमन लांबले असून, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे; पण आता सार्वत्रिक पावसासाठीचे वातावरण अनुकूल होत असून, २२ व २३ रोजी नैर्ऋत्य तर २५ ते २८ पर्यंत पूर्व किनारपट्टीकडून पावसाचे आगमन होणार आहे. त्यानंतर सार्वत्रिक पाऊस सुरू च राहणार असल्याचे भाकीत कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविले आहे.
राज्यात यावर्षी सुरुवातीला वेळेवर व भरपूर सरासरी १०२ टक्के तर त्यानंतरच्या सुधारित अंदाजानुसार ८८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली होती. काही भागात मान्सूनने प्रवेश केला असला तरी राज्यात बहुतांश भाग मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम विदर्भ व उत्तर महाराष्टÑाचा समावेश आहे. मान्सून आता आला तरी शेतकºयांना मात्र पिकात फेरबदल करावे लागणार असल्याचे शेतकºयांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, सध्या वातावरणात बदल होत असून, महाराष्ट्रातील हवेचा दाब कमी होत आहे. विदर्भातही असेच अनुकूल वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात पाण्याचे तापमान ३१ डिग्री सें. पर्यंत वाढले असून, ही सर्व पोषक स्थिती बघता, पूर्व किनारपट्टीकडून हवेचा दाब कमी झाला आहे. त्यामुळे २५ ते २८ जूनपर्यंत पूर्व व मध्य विदर्भात पूर्वेकडून पाऊस येण्याची शक्यता आहे. तर २२ व २३ जून रोजी नैर्ऋत्येकडून पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात मान्सून या अगोदरच पोहोचला आहे. आता पश्चिम विदर्भातही मान्सूनच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
- महाराष्टÑातील व विदर्भातील हवेच दाब कमी होत असून, बंगालच्या उपसागरात तापमान वाढले तर पूर्व किनारपट्टीकडून हवेचा दाब कमी झाल्याने सार्वत्रिक पावसासाठी स्थिती सध्या अनुकूल आहे. त्यामुळे २२, २३ ला पश्चिम विदर्भात, २५ ते २८ जूनपर्यंत पूर्व विदर्भात पाऊस होण्याची शक्याता आहे. त्यानंतर पाऊस सुरू राहील.
डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ,
कृषी सल्लागार,
पुणे.