बेडअभावी सिझेरिअन झालेल्या ओल्या बाळंतिणीला ठेवले जमिनीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:22 AM2021-08-27T04:22:58+5:302021-08-27T04:22:58+5:30
अकोला : जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधार असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या ...
अकोला : जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधार असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या वाॅर्ड क्र. २ मध्ये बेडअभावी सिझेरिअन झालेल्या ओल्या बाळंतीणला चक्क दोन वेळा जमिनीवर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे. कळस म्हणजे गादी पुरविण्यासही रुग्णालय प्रशासनाने नकार दिल्यामुळे या महिलेस सोबत आणलेल्या चादरीवर झोपावे लागले. नातेवाइकांनी तक्रार केल्यानंतर या महिलेस बेड मिळाला. तथापि, या वाॅर्डात अजूनही अनेक महिलांना जमिनीवरच उपचार घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. अकोला जिल्ह्यातील माहेर असलेल्या खामगावच्या एका गर्भवती महिलेस तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी शनिवारी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. शनिवारीच सिझेरिअनद्वारे प्रसूती झाल्यानंतर या महिलेस वाॅर्ड क्र. २ मध्ये बेड देण्यात आला. एक दिवस उलटल्यानंतर सोमवारी नवीन रुग्ण आल्यामुळे या महिलेस बेड रिकामा करण्यास सांगण्यात आले. नाइलाज असल्याने महिला व तिच्या आईने बेड रिकामा करताना किमान गादी तरी द्यावी, अशी मागणी केली. परंतु, कक्षात कार्यरत कर्मचाऱ्यांनी गादीही देऊ शकत नसल्याचे सांगितल्याने शेवट सोबत आणलेल्या चादरीवरच ओल्या बाळंतिणीला झोपावे लागले. काही तासांनंतर या महिलेस बेड देण्यात आला. बुधवारी सकाळी पुन्हा बेड रिकामा करण्यास सांगण्यात आला. बुधवारचा दिवस व पूर्ण रात्र या महिलेने जमिनीवरच काढली. गुरुवारी सकाळी या महिलेस बेड देण्यात आला.
अनेक महिला जमिनीवरच
महिलेच्या भावाने याबाबत रुग्णसेवक संघटनेला कळविल्यानंतर जिल्हाध्यक्ष आशिष सावळे यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला व बेड देण्याची विनंती केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी या महिलेला बेड मिळाला. आशिष सावळे यांनी गुरुवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑनलाइन तक्रारही केली आहे. अजूनही अनेक महिला रुग्ण जमिनीवरच ठेवण्यात आले आहेत. या वाॅर्डची क्षमता वाढविण्याची विनंती सावळे यांनी केली आहे.
क्षमता ३० गर्भवती महिला ६०पेक्षा अधिक
गर्भवती महिलांसाठी असलेल्या वाॅर्ड क्र. २ची क्षमता केवळ ३० बेडची आहे. सद्या सर्वोपचार रुग्णालयात गर्भवती महिला दाखल होण्याचे प्रमाण वाढले असून, या वाॅर्डात ६० पेक्षाही अधिक गर्भवती महिला दाखल आहेत. त्यामुळे अनेक महिलांना जमिनीवर ठेवण्यात आले आहे. दुसरा वाॅर्ड नसल्याने नाइलाजाने हा पर्याय स्वीकारण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाची लाट ओसरल्यानंतर गत काही दिवसांपासून गर्भवती महिलांच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वॉर्डात गर्दी वाढली आहे. उपाययोजना करण्यात येत आहेत.
- मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला