पोलिसांना कसले नियम? ठाण्यासमोर भररस्त्यावर होतेय वाहनांची पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:33+5:302021-07-01T04:14:33+5:30
रिॲलिटी चेक अकोला : एखादी कायदा व नियम जेव्हा तयार होतो, तो सरसकट सर्वांसाठी सारखाच असतो. मग कायदा राबविणारी ...
रिॲलिटी चेक
अकोला : एखादी कायदा व नियम जेव्हा तयार होतो, तो सरसकट सर्वांसाठी सारखाच असतो. मग कायदा राबविणारी यंत्रणा असली तरी त्यांनाही ते नियम लागू होतात, असे कायदा सांगतो, मात्र शहरातील एका पोलीस ठाण्यांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने नाईलाजास्तव पोलिसांकडूनच बेशिस्तपणे वाहने पार्किंग केली जात असल्याचे ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या पाहणीत आढळून आले. अकोट फाईल व सिटी कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये तर वाहन पार्किंगला जागाच नाही. वाहतुकीचे नियम असो की इतर कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची आहे. नो पार्किंग असो की रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी वाहने पार्किंग केली की वाहनधारकावर मोटार वाहन कायदा २२ (२) (एस) १७७ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाते. जानेवारी ते मे या पाच महिन्यात शहरात अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७५१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सर्वसामान्य नागरिकांवर झालेली असून काही पोलिसांवरही झाल्याची माहिती आहे.
पोलिसांना नियम लागू नाहीत का?
अकोट फाईल व सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी भेट देऊन पाहणी केली असता काही पोलीस अंमलदारांनी रस्त्याच्या बाजूला दुचाकी पार्किंग केली होती तर काही जणांनी कंपाऊडला लागूनच दुचाकी पार्किंग केल्या होत्या. या पोलीस ठाण्यात पार्किंची सोय नाही. त्यामुळे सामान्य नागरिक आजूबाजूला जेथे जागा मिळेल तेथे वाहन पार्किंग करतात.
अकोट फाईल पोलीस ठाणे
अकोट फाईल पोलीस ठाण्याची जागाच मुळात कमी आहे. या पोलीस ठाण्याच्या आवारात ना दुचाकी पार्किंगची सोय ना चारचाकी पार्किंगची सोय आहे. पोलीस ठाण्याचे वाहनदेखील पोलीस निरीक्षक व ठाणे अंमलदाराच्या दरवाजासमोरच पार्किंग करावे लागते. पोलीस कर्मचारी व सामान्य व्यक्ती यांना कंपाऊडला लागून रस्त्यानजीकच वाहने पार्किंग करावी लागत आहेत.
कोट...
नो पार्किंगमध्ये वाहन दिसले की त्यावर कारवाई केली जाते. पोलिसांच्या वाहनांनाही मेमो देण्यात आलेले आहेत. वाहन बेशिस्त पार्किंग केलेले दिसले की तेथे मालक नसला तरी फोटो घेऊन चालन बनविले जाते. ते वाहन पोलिसाचे आहे की आणखी कोणाचे हे तेव्हा कळतच नाही.
-गजानन शेळके
पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
शहरातील नो पार्किंग कारवाई
२०१९ : ८६५
२०२० : ११२३
२०२१ (मे पर्यंत) : १७५१