चारचाकीची तपासणी, दुचाकीचे काय?
By admin | Published: October 13, 2014 01:28 AM2014-10-13T01:28:22+5:302014-10-13T01:28:22+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सध्या ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू.
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सध्या ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. अवैध वस्तू किंवा रक्कम पकडल्या जावी यासाठी वाहनांची कसून तपासणी शहराच्या चहूबाजूने सुरू आहे; परंतु चारचाकी वाहनांची तपासणी होत असताना दुचाकीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. दुचाकीतूनही अवैध वस्तू किंवा रकमेची वाहतूक होऊ शकते याचे भानच तपासणी करणार्यांना नसल्याचे दिसते.
विधानसभा निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात अवैध रकमेची उलाढाल होते. आतापर्यंत करोडो रुपयांची रक्कम राज्यातील विविध शहरांच्या सीमेवर पकडल्या गेली. अकोला शहरातदेखील अवैध वस्तू किंवा रक्कम येऊ नये यासाठी रस्त्याच्या चहूबाजूंनी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. अकोल्यात मंगरुळपीर रस्त्यावर खडकीजवळ, पातूर रस्त्यावर हिंगणा फाटा येथे, बाळापूर रस्त्यावर टी-पॉईंटवर, मूर्तिजापूर रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर, आकोट रस्त्यावर शासकीय गोडाऊन जवळ, आपातापा रस्त्यावर रेल्वे क्वार्टरच्या मागील बाजूस तसेच डाबकी रोड, येवता रोड, गुडधी रोडवर ठिकठिकाणी चेक पोस्ट नाके तयार करून तिथे गाड्यांची तपासणी केली जात आहे.
चेक पोस्ट नाक्यावर इंडो-तिबेट तसेच नागालँन्डचे हत्यारबंद पोलिस कसून चारचाकी वाहनांची तपासणी करीत आहेत. महाराष्ट्र पोलिसदेखील त्यांच्या सोबतीला आहेत. या शिवाय निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारीदेखील आहेत. हे सर्व चारचाकी वाहन थांबवून डिक्की उघडून व चालकाची चौकशी करून तपासणी करीत आहेत; परंतु या तपासणीतून दुचाकी वाहनांना वगळण्यात आले आहे. ज्याप्रमाणे चारचाकीतून अवैध वस्तू व रकमेची वाहतूक होऊ शकते त्याप्रमाणे दुचाकीतूनदेखील अवैध वस्तू व रकमेची वाहतूक होऊ शकते याकडे हे कर्मचारी साफ दुर्लक्ष करीत आहेत. नेमके हेच भारी पडू शकते, याची कोणालाही शंका नाही.