काय म्हणता...इंग्रज अकोल्यात छापत होते चलनी नोटा!
By atul.jaiswal | Published: July 12, 2021 10:14 AM2021-07-12T10:14:30+5:302021-07-12T10:16:40+5:30
The British were printing currency notes in Akola : १८६१ ते १९३० या ७० वर्षांच्या कालावधीत अकोला येथे ५, १०, २०, ५०, १००, ५०० रुपयांच्या नोटांची छपाई होत असे
अकोला : स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी भारतातील मोठ्या शहरांसाेबतच अकोल्यातही चलनी नोटांची छपाई केली होती. थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ७० वर्षे इंग्रजांच्या चलनी नोटांची छपाई अकोल्यात केली जात होती, अशी रंजक माहिती येथील मुद्रा संग्राहक व अभ्यासक अक्षय प्रदीप खाडे यांनी दिली आहे. (The British were printing currency notes in Akola)
सन १८६१ ते १९३० या ७० वर्षांच्या कालावधीत अकोला येथे ५, १०, २०, ५०, १००, ५०० रुपयांच्या नोटांची छपाई होत असे. याबाबत अधिक माहिती देताना अक्षय खाडे यांनी सांगितले की, या नोटांची छपाई केवळ एकाच बाजूस केलेली असे. त्यास "युनिफेस नोट" असे म्हणत असत. हाताने तयार केलेल्या एका विशिष्ट कागदावर या नोटांची छपाई केली जात असे. अकोल्यासोबतच कलकत्ता, अलाहाबाद, लाहोर, बॉम्बे, कराची, नागपूर, मद्रास व रंगून येथेसुद्धा इंग्रजांच्या चलनी नोटांची छपाई होत असे. या नोटांची पार्श्वभूमी हिरव्या व लाल रंगाची होती. त्यावर नोट छापल्याची तारीख व छपाईचे ठिकाण नमूद केलेले असायचे. त्या काळात रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली नसल्याने नोटांवर "गव्हर्नमेंट ऑफ इंडिया" असे लिहिलेले असायचे, असे अक्षय खाडे यांनी सांगितले.
जेम्स विल्सन यांनी केली होती पाहणी
ईस्ट इंडिया कंपनीचे वित्तीय संचालक जेम्स विल्सन यांनी १८५९ साली नोटांची छपाई करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी नोटांऐवजी नाण्यांचा वापर चलनात होत असे. जेम्स विल्सन यांनी स्वतः अकोला येथे येऊन जागेची व शहराची पाहणी केली होती. अकोला हे रेल्वेमार्गावरील एक प्रमुख शहर असल्याने त्यांनी अकोल्यात नोटा छपाई करण्यास मंजुरी दिली होती.
अशा होत्या नोटा
या नोटांवर डाव्या व उजव्या बाजूस नोटेचा सिरीयल नंबर टाकलेला असायचा आणि ६ भाषांमधून मजकूर असायचा. अकोल्यात छापल्या जाणाऱ्या नोटांवर उर्दू, गुजराती, मराठी, कन्नड व इंग्रजी या भाषांतील मजकूर असायचा. ५ रुपयांची नोट १० × १६ सेंटिमीटर आकाराची, तर १० ते १००० रुपयांची नोट १२ × १७ सेंटिमीटर आकाराची असायची.
तत्कालीन हिंदुस्थानातील कलकत्ता, अलाहाबाद, लाहोर, बॉम्बे, कराची, नागपूर, मद्रास या मोठ्या शहरांमध्ये इंग्रज चलनी नोटा छापायचे. रेल्वेमार्गावरील प्रमुख शहर म्हणून त्या काळी अकोल्यातही चलनी नोटांची छपाई करण्यात येत होती.
- अक्षय खाडे, मुद्रा संग्राहक व अभ्यासक, अकोला