धावत्या रेल्वेत अचानक छातीत दुखू लागले तर?
By Atul.jaiswal | Published: December 20, 2021 10:50 AM2021-12-20T10:50:13+5:302021-12-20T10:52:16+5:30
Railway Doctor call : रेल्वेच्या १३८ या हेल्पलाइनवर संपर्क करून डॉक्टर कॉल सुविधेचा वापर केल्यास पुढील रेल्वेस्थानकावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकते.
अकोला : धावत्या रेल्वेत अचानक कोणाची तब्येत बिघडली, छातीत वेदना व्हायला लागल्या किंवा इतर काही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर, अशा वेळी रेल्वेच्या १३८ या हेल्पलाइनवर संपर्क करून डॉक्टर कॉल सुविधेचा वापर केल्यास पुढील रेल्वेस्थानकावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकते.
अकोला स्थानकावरून दररोज अनेक गाड्यांचे आवागमन सुरू असते. यामध्ये हजारो प्रवासी प्रवास करत असतात. एखाद्या वेळी प्रवाशांना अचानक प्रकृतीचा त्रास उद्भवतो. अशा वेळी तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. या आपत्कालीन स्थितीत रेल्वेची डॉक्टर कॉल सुविधा उपयोगी पडते. तिकीट पर्यवेक्षकाला कळविल्यास किंवा १३८ या हेल्पलाइनवर संपर्क केल्यास तातडीने डॉक्टर उपलब्ध होतात व उपचार करतात. गरज भासल्यास रुग्णालयातही दाखल करण्यात येते. तशी गरज नसल्यास एका दिवसाचे औषध देऊन संबंधित व्यक्तीला पुढच्या प्रवासाला पाठविले जाते. रेल्वेच्या या सुविधेचा अनेकांना लाभ होत आहे.
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस
हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस
कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस
गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस
अहमदाबाद-चेन्नई एक्स्प्रेस
अमरावती-मुंबई एक्स्प्रेस
हावडा-मुंबई एक्स्प्रेस
अचानक वैद्यकीय गरज लागली तर काय कराल?
रेल्वे प्रवासात वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास सर्वप्रथम तिकीट पर्यवेक्षकाला संबंधित व्यक्तीला काय त्रास होत आहे याबाबत माहिती द्यावी. तिकीट पर्यवेक्षक त्या माहितीच्या आधारे नियंत्रण कक्षाला सांगेल. यामध्ये प्रवाशाला होणारा त्रास ते बर्थ क्रमांक आदीचा समावेश असेल. रेल्वे धावत असेल, तर पुढच्या स्थानकावर डॉक्टर रुग्णवाहिकेसह दाखल होतात. संबंधित रुग्णाच्या सीटवर जाऊन उपचार केले जातात. डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत गाडी फलाटावर उभी राहते.
प्रवाशांना रेल्वेत वैद्यकीय उपचाराची गरज पडल्यास त्यांना ती तातडीने उपलब्ध करून दिली जाते. यासाठी रेल्वेची डॉक्टर कॉल सुविधा अनेक दिवसांपासून सुरू आहे. प्रवासी हेल्पलाइनवर किंवा तिकीट पर्यवेक्षकाला सांगून ही सुविधा मिळवू शकतात, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.