आखरी ख्वाईश क्या है; तेल्हाऱ्यातील रस्त्यांची दुरुस्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:59+5:302021-09-23T04:21:59+5:30
प्रशांत विखे तेल्हारा : सोशल मीडिया हे आपले प्रश्न मांडण्यासाठी प्रभावी साधन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची स्तुती, ...
प्रशांत विखे
तेल्हारा : सोशल मीडिया हे आपले प्रश्न मांडण्यासाठी प्रभावी साधन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची स्तुती, तर अनेकांना ट्रोल केले जाते. तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत निवेदन, लेखी तक्रार, आंदोलने केली; मात्र रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सोशल मीडियावर एल्गार पुकारला असून, तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न पेटला आहे. सोशल मीडियावर अनेक मॅसेज व्हायरल करून नागरिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाला चांगलाच चिमटा काढीत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेकांचा प्रतिसाद मिळत असल्याने तालुक्यात चर्चा रंगली आहे.
दोन वर्षांपूर्वीपेक्षा जास्त काळ लोटूनही अडसूळ-तेल्हारा-हिवरखेड व वरवट-तेल्हारा-वणी वारुळा रस्त्याचे काम अपूर्णच आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात रस्ते चिखलमय झाल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रस्त्यावरील अपघातात अनेकांनी जीव गमावला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. असे असतानाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग आली नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी लोकप्रतिनिधी, पालकमंत्री व संबंधित अधिकाऱ्याकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही समस्या निकाली लागत नसल्याने नागरिक हतबल झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर अनेकांना चांगलेच धाऱ्यावर धरल्याचे दिसून येत आहे. मॅसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने आतातरी संबंधित यंत्रणेला जाग येईल अशी माफक अपेक्षा नागरिक ठेवून आहेत.
------------------
रस्ता नाही, तर टॅक्स कसा?
शासन प्रत्येक वाहनधारकाकडून रोड टॅक्सचा भरणा करून घेते; मात्र रोडतर नाहीच, पण ज्या रोडमुळे प्रवाशांची जीवितहानी व वित्तहानी होत असेल, तर टॅक्स कोणी कोणाला द्यावा, असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित केला जात आहे.
---------------------------------
रस्ते चिखलमय, अपघाताच्या घटना वाढल्या
पावसाळ्याच्या दिवसांत तेल्हाऱ्याला जोडणारे रस्ते चिखलमय झाल्याने वाहने घसरून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. चिखलात वाहने अडकून पडत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत.