शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी काय उपाययोजना केल्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:18 AM2021-03-06T04:18:31+5:302021-03-06T04:18:31+5:30
अकोला: जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा करीत केलेल्या उपाययोजनांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ...
अकोला: जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा करीत केलेल्या उपाययोजनांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना दिले.
२४ जुलै २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात जिल्ह्यातील कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी गत दोन वर्षांच्या कालावधीत उपाययोजनांची काय कार्यवाही करण्यात आली, अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना केली. यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याने, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी केलेल्या उपाययोजनांच्या कार्यवाहीची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिले.
‘या’ यंत्रणांना दिले निर्देश!
आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, कृषी विभाग, रोजगार हमी योजना विभाग, मत्स्य व्यवसाय विकास विभाग, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), लघु सिंचन विभाग, जिल्हा अग्रणी बॅंक इत्यादी यंत्रणांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी काय उपाययोजना केल्या, यासंदर्भात तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी काय उपाययोजना केल्या, यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना दिले.
जितेंद्र पापळकर
जिल्हाधिकारी