शस्त्र बाळगण्याच्या परवान्याची उठाठेव का?
By admin | Published: August 13, 2016 01:37 AM2016-08-13T01:37:22+5:302016-08-13T01:37:22+5:30
अकोला जिल्हा परिषदेत वाढत्या मारहाणीच्या घटना; अधिका-यांच्या मागणीवर लोकप्रतिनिधींचा सवाल.
अकोला, दि. १२ : जिल्हा परिषदेत वारंवार मारहाणीच्या घटना होत असल्याने अधिकारी -कर्मचार्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने, स्वत:चे संरक्षण करण्यासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्याची मागणी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली; मात्र सर्वसामान्यांची कामे तातडीने झाल्यास आणि समन्वयाचे वातावरण असल्यास मारहाणीच्या घटना घडणार नाहीत. शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळविल्याने, समस्या सुटणार नाही आणि कामे होणार नाहीत, त्यामुळे शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळण्याबाबत मागणीची उठाठेव कशासाठी, असा सवाल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी ह्यलोकमतह्णशी बोलताना उपस्थित केला आहे.
अकोला जिल्हा परिषदेत ९ ऑगस्ट रोजी पंचायत विभागातील ग्राम विकास अधिकारी मनोज बोपटे यांना भारती क्रीडा व शिक्षण मंडळाच्या सचिव भारती निम यांनी मारहाण केली. ग्रामविकास अधिकारी बोपटे यांना मारहाण करण्यात आल्यानंतर त्यांच्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची भेट घेऊन, निवेदन दिले. जिल्हा परिषदेत वारंवार मारहाणीच्या घटना घडत असल्याने, अधिकारी व कर्मचार्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकार्यांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा, अशी मागणीही केली. अधिकार्यांच्या मागणीनुसार शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्याबाबत विचार करू, असे आश्वासन जिल्हाधिकार्यांकडून देण्यात आले. परंतु, शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्याची मागणी कशासाठी, असा सवाल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी ह्यलोकमतह्णशी बोलताना उपस्थित केला.