हिंदू राष्ट्रामध्ये ओबीसींचे स्थान काय असेल?
By admin | Published: October 13, 2016 03:14 AM2016-10-13T03:14:54+5:302016-10-13T03:14:54+5:30
अँड. आंबेडकर यांचा सवाल; धम्म मेळाव्यात शासन, ‘आरएसएस’चा घेतला समाचार.
सदानंद सिरसाट
अकोला, दि. १२- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदू राष्ट्र निर्मितीचा घाट घातला जात आहे. त्यामध्ये ओबीसी समाजाचे स्थान कुठे असेल. पूर्वीची विषमतावादी समाजरचना उभारण्याऐवजी पूर्वापार चालत आलेली विषमता संपवण्याचा मान आता संघाने घ्यायला हवा, देशात समानता नसेल, तर हिंदुराष्ट्राचे करायचे काय, असा सवाल अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवानिमित्त क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी, तर अतिथी म्हणून चैत्यभूमीचे व्यवस्थापक भन्ते बी. संघपाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
केंद्र शासनाने व्यावसायिक शिक्षणाची भूमिका मांडली. त्याचवेळी राज्य शासन पूर्वापार चालत आलेले जातींचे व्यवसाय बळकट करण्याची भाषा कौशल्य विकासाच्या नावाखाली बोलत आहे. त्यातून जातीव्यवस्था पुन्हा बळकट करण्याचे धोरण आखले जात आहे, असेही अँड. आंबेडकर म्हणाले. शिक्षणामध्ये जुन्या गुरुकुल पद्धतीची वाच्यता केली जात आहे. ते महागडे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होईल. हा प्रकार बाबासाहेबांनी दिलेल्या 'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे', या मंत्रावर हल्ला करण्यासारखा आहे. शिक्षणक्षेत्रात घातलेल्या गोंधळाचे परिणाम आता हळूहळू समोर येत आहेत. वाढत्या लोकसंख्येत बेकारीची समस्या आहे. त्या तरुणांचा वेगळाच वापर करण्याचे तंत्र मांडले जात असल्याचे अँड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
शेतकर्यांना लुटणारे ओबीसी किंवा दलित नाहीत, ते व्यापारी आणि राज्यकर्तेच आहेत. त्यांना हाकलण्यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे. शेतकर्यांचे खरे भांडण हे अर्थव्यवस्थेशी आहे. त्या व्यवस्थेशी लढायचे असेल, तर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची कास धरण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. देशाची सत्ता गरिबाच्या हातात आल्याशिवाय बदल होणारच नाही, त्या बदलासाठी आपण तयार आहोत का, असेही त्यांनी विचारले.
मंचावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार, कार्याध्यक्ष काशीराम साबळे, प्रा. अंजली आंबेडकर, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखॉ पठाण, सभापती रेखा अंभोरे, देवकाबाई पातोंड, पक्षाचे पदाधिकारी डॉ.डी.एम. भांडे, डी.एन. खंडारे, प्रतिभा अवचार, डॉ.हर्षवर्धन मालोकार, डॉ.रहमान खान, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषद गटनेता दामोदर जगताप, मनपा गटनेता गजानन गवई, कोषाध्यक्ष राजूमिया देशमुख, सुभाष रौंदळे, राजू खोने, पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ. प्रसन्नजित गवई उपस्थित होते. संचालन राजाभाऊ लबडे यांनी तर आभार भीमराव तायडे यांनी केले.
सत्ता जातीमध्ये नव्हे, तर कुटुंबामध्ये!
सत्ता जातींमध्ये नव्हे, तर जातींच्या काही कुटुंबामध्ये अडकली आहे. सर्व राजकीय पदे केवळ १६९ कुटुंबात विभागली आहेत.
सैन्य कारवाईचेही मार्के टिंग..
प्रधानमंत्री मोदी यांनी सैनिकांशिवाय ५६ इंच छाती ताणून काश्मिरात जाऊन दाखवावे, सैन्याने केलेल्या कारवाईचे नको तसे मार्केटिंग करण्याची हौस करू नये, असा टोलाही अँड. आंबेडकर यांनी लगावला. कधी नव्हे ते या सरकारने सैन्याच्या कारवाईचे राजकारण, भांडवलीकरणासोबतच बाजारीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केला. उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्य़ासमोर ठेवून हा प्रकार केला जात असल्याचेही ते म्हणाले.
बहुजन नेत्यांवर भाजप, संघाकडून 'ऑपरेशन'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपने अनेक मराठा नेत्यांना सध्या शस्त्रक्रिया गृहात ठेवले आहे. आमच्या पद्धतीने वागत नसाल, तर शस्त्रक्रिया करू, असा दमच दिला जात आहे. त्यामुळे लगतच्या काळात अनेकांवर झालेली शस्त्रक्रिया आपणावर नको म्हणून मराठा नेते त्यांना बळी पडत आहेत, असेही अँड. आंबेडकर यांनी सांगितले.
महिलांवर घरात होणार्या अत्याचारावरही बोला
महिलांवर बाह्य जगात होणार्या अत्याचारासंदर्भात बोलले जाते. त्यावर मोर्चेही निघतात. मात्र, त्याचवेळी घरात होणार्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचीही चळवळ व्हायला हवी.