वखारच्या गोदामातील गव्हाची पुन्हा तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:00 AM2019-04-15T06:00:15+5:302019-04-15T06:00:28+5:30
‘सीडब्ल्यूसी’च्या गोदामातील गहू चांगलाच असल्याचा डंका पिटणाऱ्या ‘एफसीआय’ने शुक्रवारपासून गव्हाची दुसऱ्यांदा स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू केली आहे.
अकोला : ‘सीडब्ल्यूसी’च्या गोदामातील गहू चांगलाच असल्याचा डंका पिटणाऱ्या ‘एफसीआय’ने शुक्रवारपासून गव्हाची दुसऱ्यांदा स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू केली आहे. तसेच जिल्हाधिकाºयांनी गोदामातील ‘एफएक्यू’ गहूच घ्यावा, यापूर्वी तहसीलच्या गोदामात पुरवठा झालेला खराब गहू परत घेतला जाईल, असे एफसीआयने मान्य केल्याने गव्हाची उचल सुरू करण्यात आली आहे.
‘एफसीआय’ने मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथून अकोला ‘सीडब्ल्यूसी’च्या गोदामात गव्हाचा साठा करण्यास सुरुवात केली. ६ मार्चपर्यंत ७० हजार पोत्यांचा साठा झाला. त्यामध्ये गहू भिजलेला, खापरा कीडग्रस्त, १७ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रतेचा असल्याचे वरिष्ठ गोदाम व्यवस्थापकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ एफसीआय, सीडब्ल्यूसीच्या वरिष्ठांना मेलद्वारे माहिती दिली. त्यावर १४ मार्च रोजी एफसीआयच्या मुंबई कार्यालयातील गुणवत्ता तपासणी अधिकारी पी. के. बिहारी यांना अकोल्यात पाठविण्यात आले.
त्यांच्या तपासणी अहवालानुसार एफसीआय नागपूरचे प्रादेशिक व्यवस्थापक ए. के. लाल यांनी १८ मार्च रोजी जिल्हाधिकाºयांना पत्र देत गहू केंद्र शासनाच्या निकषानुसार एफएक्यू दर्जाचा आहे. त्याची उचल करावी, तसेच गोदामातील गहू खराब असल्याची माहिती निराधार असल्याचाही दावा केला.
विशेष म्हणजे, सीडब्ल्यूसीच्या गोदामातील खराब गहू असल्याचे वास्तव असल्यानंतरही गहू
चांगलाच असून, त्याची उचल करावी, असेही एफसीआयने जिल्हाधिकाºयांना पत्रात म्हटले
आहे.