दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचे ‘कवच’ केव्हा?
By admin | Published: May 28, 2016 02:00 AM2016-05-28T02:00:46+5:302016-05-28T02:00:46+5:30
जिल्ह्यात ९४२ गावांतील शेतकर्यांना सरकारी मदतीची प्रतीक्षा.
संतोष येलकर / अकोला
जिल्ह्यातील लागवडयोग्य सर्व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली असली तरी दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी शासनामार्फत अद्यापही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या दुष्काळी मदतीचे कवच केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील ९४२ गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगामातील नजरअंदाज पैसेवारीच्या आधारे जिल्ह्यातील लागवडयोग्य ९९७ गावांपैकी ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली ५५ गावे शासनामार्फत गत ऑक्टोबरमध्ये दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली.
या गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी मदतदेखील प्राप्त झाली आहे. त्यानंतर शासनाच्या गत २३ मार्च रोजीच्या निर्णयानुसार, सुधारित व अंतिम पैसेवारीच्या आधारे ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील लागवडयोग्य सर्व ९९७ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली.
दुष्काळ जाहीर होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकर्यांसाठी शासनामार्फत अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त ९४२ गावांमधील शेतकरी अद्याप सरकारच्या दुष्काळी मदतीपासून वंचित आहेत. सतत तीन वर्षांपासूनची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळाने होरपळणार्या शेतकर्यांकडे पैसा नाही. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतीची मशागत आणि पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकर्यांना सतावत आहे. त्याअनुषंगाने सरकारची दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील ९४२ गावांमधील शेतकर्यांकडून केली जात आहे.