जिल्हाधिकारी मांजा पकडतात तेव्हा..!
By admin | Published: January 15, 2016 02:04 AM2016-01-15T02:04:05+5:302016-01-15T02:04:05+5:30
मुलाच्या आईने जाळला नायलॉन मांजा.
अकोला: एका कार्यक्रमासाठी गायगाव येथे जात असताना, रस्त्यावर पतंग उडविणार्या एका मुलाजवळ जाऊन, त्याच्याकडील नायलॉन मांजा गुरुवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पकडला. जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार संबंधित मुलाच्या आईने मांजा जाळून टाकला. जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या गायगाव येथे गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत जात होते. गावात जाताना एक दहा वर्षीय मुलगा रस्त्यावर पतंग उडवित असल्याचे त्यांनी पाहिले. गाडी थांबवून जिल्हाधिकारी पतंग उडविणार्या मुलाजवळ गेले; त्याच्या पतंगचा मांजा त्यांनी बघितला. तो नायलॉन मांजा असल्याचे जिल्हाधिकार्यांच्या लक्षात आले. हा मांजा जीवास धोकादायक असून, पतंग उडविण्यासाठी या मांजाचा वापर करणे योग्य नसल्याचे त्यांनी त्या मुलास सांगितले. पतंगचा नायलॉन मांजा काढून जाळण्याबाबत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी संबंधित मुलाच्या आईला सांगितले. त्यानुसार मुलाच्या आईने पतंगचा नायलॉन मांजा जाळून टाकला. जिल्हाधिकार्यांनी मुलाच्या हातातील मांजा पकडून तो जाळल्याबाबतची चर्चा गायगावसह परिसरात दिवसभर सुरू होती.