कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी; ज्येष्ठांना सतावतेय चिंता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:20 AM2021-05-21T04:20:21+5:302021-05-21T04:20:21+5:30
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला ज्येष्ठांसह ४५ वर्षांवरील लाभार्थींचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ १८ वर्षांवरील तरुणांचाही लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र ...
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला ज्येष्ठांसह ४५ वर्षांवरील लाभार्थींचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ १८ वर्षांवरील तरुणांचाही लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र लसीच्या तुटवड्यामुळे तरुणांचे लसीकरण थांबविण्यात आले. परिणामी सद्य:स्थितीत केवळ ४५ वर्षांवरील लाभार्थींचेच लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ६४ हजार २७५ लाभार्थींनी लस घेतली. यातील बहुतांश लाभार्थींनी लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. त्यामुळे अशा कुटुंबातील ज्येष्ठांना तरुणांच्या लसीकरणाची चिंता सतावते आहे. आतापर्यंत १८ ते ४५ वयोगटातील केवळ १७ हजार ७०३ तरुणांनीच लसीचा पहिला डोस घेतला आहे. याच गटामध्ये लाभार्थींची संख्या जास्त असल्याने तरुणांचे लसीकरण कधी, हा प्रश्न आता तरुणांसह कुटुंबातील ज्येष्ठांनाही पडला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
वयोगट - पहिला डोस - दुसरा डोस
ज्येष्ठ - ७८,६३३ - २६१३५
४५ ते ६० - ८५१५७ - २०५२६
१८ ते ४५ - १७,३०५
तरुण कामानिमित्त बाहेर जातात, त्यांनाही लवकर लस मिळावी!
कोरोनाच्या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे. तरुणाईला कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता त्यांच्या लसीकरणाला महत्त्व देणे गरजेचे आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- रामलाल क्षीरसागर, पालक
बहुतांश ज्येष्ठांचे लसीकरण झाले आहे, मात्र तरुणांच्या लसीकरणाचा प्रश्न कायम आहे. तरुण कामानिमित्त बाहेर जातात. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क येतो, अशा परिस्थितीत त्यांचे लसीकरण आवश्यक आहे.
- प्रकाश इंगळे, पालक
अनेक जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
४५ वर्षांवरील बहुतांश लाभार्थींनी लसीचा पहिला डोस घेतला, मात्र दुसरा डोस केवळ पाच टक्के लाभार्थींनीच घेतला आहे. लसीचा तुटवडा असताना केवळ दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. असे असले तरी अनेक जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. दुसऱ्या डोसचा गोंधळ कमी होत नाही तोपर्यंत तरुणांना लसीकरणाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.