अमरावती एक्स्प्रेस कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:13 AM2021-06-27T04:13:39+5:302021-06-27T04:13:39+5:30
कोरोनामुळे रेल्वेच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला. प्रवासी नसल्याने मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता ...
कोरोनामुळे रेल्वेच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला. प्रवासी नसल्याने मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता हळूहळू निर्बंध शिथिल होत असल्याने प्रवासी संख्याही वाढली आहे. मोठ्या शहरातील उद्योग, व्यवसाय पूर्ववत होत आहेत. त्यामुळे गावाकडे परतलेले मजूर पुन्हा शहराकडे जात आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षणही फुल्ल होत आहे ; परंतु अद्यापही काही महत्त्वाच्या रेल्वे सुरू झाल्या नाही. यामध्ये पॅसेंजर गाड्यांचा ही समावेश आहे. वऱ्हाडासाठी महत्त्वाची असलेली अमरावती-सूरत एक्स्प्रेस ही बंद आहे. या रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
गितांजली एक्स्प्रेस
नवजीवन एक्स्प्रेस
आझाद हिंद एक्स्प्रेस
पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस
हावडा-सुरत एक्स्प्रेस
या गाड्या कधी सुरू होणार?
अमरावती-सुरत एक्स्प्रेस
भुसावळ-वर्धा पॅसेंजर
भुसावळ-नागपूर पॅसेंजर
भुसावळ-नरखेड पॅसेंजर
शालिमार एक्स्प्रेस
पॅसेंजर गाड्यांचे घोडे अडले कुठे?
गर्दीने गच्च भरणाऱ्या पॅसेंजर गाड्या मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे बंद करण्यात आल्या आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर या रेल्वे अद्यापही बंद आहे.
जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या तीनही पॅसेंजर सुरू झालेल्या नाही. यामध्ये भुसावळ-नागपूर, भुसावळ-नरखेड, भुसावळ-वर्धा या पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.
निर्बंध शिथिल झाल्यानंतरही यामधील एकही पॅसेंजर सुरू झाली नाही. त्यामुळे या पॅसेंजर गाड्यांचे घोडे अडले कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रवासी काय म्हणतात...
मूर्तिजापूर येथे ड्युटी असल्याने दररोज पॅसेंजर रेल्वेने ये-जा करत होतो ; परंतु कोरोनामुळे पॅसेंजर बंद आहेत. त्यामुळे एसटी बस किंवा स्वत:च्या खासगी गाडीने जावे लागत आहे.
- प्रवीण देशमुख
गावी जाण्यासाठी रेल्वेचा मोठा आधार होता ; परंतु जवळपास जाण्यासाठी पॅसेंजर बंद आहे. कोरोनामुळे त्या कधी सुरू होतील याची श्वाश्वती नाही. परिणामी, बसने प्रवास करावा लागतो.
- किशोर पाटील