वारी भैरवगड शिवारातील शेतकऱ्यांना संत्रा पीक विम्याचा लाभ केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:19 AM2021-07-29T04:19:38+5:302021-07-29T04:19:38+5:30
सौंदळा : येथून जवळच असलेल्या वारी भैरवगड शिवारातील संत्रा उत्पादक शेतकरी दरवर्षी संत्रा पिकाचा पीक विमा काढतात. मात्र, नैसर्गिक ...
सौंदळा : येथून जवळच असलेल्या वारी भैरवगड शिवारातील संत्रा उत्पादक शेतकरी दरवर्षी संत्रा पिकाचा पीक विमा काढतात. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा पिकाचे नुकसान होते. पीक विमा काढूनही लाभ मिळालाच नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वारी भैरवगड शिवारातील शेतकऱ्यांना संत्रा पिकाचा विम्याचा लाभ केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
सौंदळा परिसरातील सौंदळा, वारखेड, बाद खेड, वारी, पिंपरखेड, कार्ला परिसरात दरवर्षीच कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, कपाशीला लगणारा खर्च, उत्पादनातील घट लक्षात घेता शेतकरी फळबाग पिकाकडे वळले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून वारी, भैरवगड शिवारात शेतकऱ्यांनी संत्रा पिकाची दरवर्षीच मोठ्या प्रमाणत लागवड होत आहे. पाच वर्षांपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी संत्रा पिकाची लागवड केली असल्याने शेतकरी दरवर्षीच पीक विमा काढतात. अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याने शेतकरी संकटात आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्याची मागणी, शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. शेतकऱ्यांनी कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त अमरावती, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनावर शंकरराव पुंडकर, वृषाली दिलीप पुदाखे, दिलीप पुदाखे, जगन्नाथ सित्रे, गुलाब महारणार, सुभाष रहाणे, श्रीकृष्ण हागे, ज्ञानदेव खाडे, गोपाल साबळे, किशोर साबळे, महादेव साबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
--------
...अन्यथा रास्ता रोको आंदोलन
वारी, भैरवगड शिवारातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ अद्यापही मिळाला नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पीक विमा न मिळाल्यास शेतकरी उपोषण किंवा रास्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.
---------------------