शिर्ला ग्रामपंचायत कोविड रुग्णालयाला परवानगी कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:37+5:302021-05-21T04:19:37+5:30
जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील भागात सर्वाधिक कोविड रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे गावकऱ्यांना गावातच ऑक्सिजन बेडसह कोविड ...
जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील भागात सर्वाधिक कोविड रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे गावकऱ्यांना गावातच ऑक्सिजन बेडसह कोविड हॉस्पिटल उभारणीचा ठराव गत महिन्यात सरपंच अर्चना सुधाकर शिंदे, उपरपंच कल्पना ज्ञानेश्वर खर्डे, ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुसज्ज अद्यावत कोविड हॉस्पिटल उभारणी करण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र गावविकास कृती आराखडाअंतर्गत सदर निधी ग्रामपंचायतला सुमारे अंदाजे पंधरा लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. सदर निधी कोविड हॉस्पिटल उभारणी करण्यासाठी ग्रामपंचायतची तयारी आहे. मात्र यासाठी अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची रितसर परवानगी अपेक्षित आहे. परंतु गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषद प्रशासनाने कोविड रुग्णालयासाठी परवानगी दिली नाही.
..तर रुग्णांना मिळतील उपचार
गावात वाढती कोविड रुग्णसंख्या आणि बेडची अपुरी अवस्था पाहता ग्रामीण नागरिकांचा जीव धोक्यात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने शिर्ला ग्रामपंचायतला कोविड केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी दिली तर शिर्ला गावासह तालुक्यातील कोरोना रुग्णांना याठिकाणी उपचार मिळू शकतील.