शेतकऱ्यांनी हळद विकायची कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:19 AM2021-03-16T04:19:15+5:302021-03-16T04:19:15+5:30
हळद काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. मागील काही दिवसांपासून हळद काढणी व शिजवणी सुरू आहे. हमखास उत्पादन देणारे पीक ...
हळद काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. मागील काही दिवसांपासून हळद काढणी व शिजवणी सुरू आहे. हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून गेल्या काही वर्षात हळद पिकाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. कमी कालावधीत तयार होणाऱ्या जातीची हळद काढण्यात येणार आहे. मात्र, सर्वाधिक पेरल्या जाणाऱ्या पारंपरिक वाणांची काढणी आता सुरू झाली. या हंगामात जास्त पाऊस झाल्याने, काही भागांत हळदीला कंदकुज दिसून आली होती. आता याचा फटका उत्पादनावर झालेला आहे. बाजारपेठेत हळदीला मागणी वाढल्याने हळदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हळदीच्या दरांनी गेल्या सात वर्षांतील उच्चांक गाठला आहे. मागील काही वर्षांत हळदीला ५ ते ६ हजार रुपये दर मिळाला होता. मात्र, यंदा प्रथमच १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मात्र, जिल्ह्यात हळदीला बाजारपेठ उपलब्ध नाही. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. हळद मराठवाड्यातील बाजारपेठांमध्ये विक्री करण्यास घेऊन जावी लागते. माल घेऊन जाण्यासाठी वाहतूक खर्च अधिकचा लागत असल्याने अडचणी येत आहे.
--बॉक्स--
मराठवाड्यातील बाजारपेठेत जातो माल
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाशीम ही जवळची बाजारपेठ आहे. मात्र, येथे कमी भाव असल्याने मराठवाड्यातील हिंगोली, बसमत, जिंतूर येथे माल विक्रीसाठी घेऊन जावे लागते.
--बॉक्स--
‘राजापुरी’ला सोन्याचे दिवस
अकोला जिल्ह्यातील हळदीला ७,००० ते ८,५०० रुपये क्विंटल भाव असल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजापुरी हळदीला ७,६०० ते १७,००० रुपये क्विंटल भाव मिळत आहे.
--बॉक्स--
कंदकुजमुळे उत्पादनात घट
कंदकुज, करपा, धुक्यामुळे हळदीचे उत्पादन २० ते ४० टक्क्यांनी कमी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले, शिवाय किडींमुळे पिकांना फटका बसला आहे.