हृदयरोग असो वा ॲलर्जी, कोरोना लस घ्यायलाच हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:21 AM2021-03-09T04:21:35+5:302021-03-09T04:21:35+5:30
अकोला : कोरोना संसर्गाला अटकाव म्हणून भारतात लसींचा शोध लागल्यानंतर सरकारने १६ जानेवारीपासून युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली ...
अकोला : कोरोना संसर्गाला अटकाव म्हणून भारतात लसींचा शोध लागल्यानंतर सरकारने १६ जानेवारीपासून युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. परंतु अजूनही लोकांच्या मनात लसींविषयी गैरसमज असल्याच्या पृष्ठभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसी अत्यंत सुरक्षित असून, हृदयरोग, किडणीविकार, ॲलर्जी किंवा इतर कोणतेही आजार असलेल्यांनी निसंकोचपणे ही लस घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
कोरोना महामारीमुळे लाखो जीव गेल्यानंतर भारतात तयार झालेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या लसी आशेचा किरण म्हणून समोर आल्या आहेत. तथापी, अजूनही लोकांमध्ये या लसींविषयी गैरसमज आहेत. देशात १ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले. आता दुसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वयोगटातील सहव्याधीग्रस्त व इतर गंभीर आजार असलेल्यांना लस देण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात या मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ७ मार्चपर्यंत २४,१३६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये ६९१८ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात या मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ७ मार्चपर्यंत २४,१३६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये ६९१८ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने शासकीय लसीकरण केंद्रे व खासगी रुग्णालयातील केंद्रांमध्ये व्यवस्था केली आहे. कोरोना प्रतिबंधक लसी घेणे गरजेचे असले, तरी अनेकांच्या मनात याविषयी शंका आहेत. यासंदर्भात लोकमत ने तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली असता, ही लस सुरक्षित असून, त्यापासून कोणताही धोका किंवा दुष्परिणाम नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
थंडी-ताप आला तरी घाबरू नये...
लसीकरणानंतर थंडी, ताप किंवा हातपाय दुखणे असा त्रास होऊ शकतो. ही एक सामान्य प्रतिक्रिया आहे. त्यामुळे ताप आला तरी घाबरण्याचे कारण नाही. आजपर्यंत कोणताही गंभीर दुष्परिणाम झाल्याचे उदाहरण नाही. लसीकरणानंतर दिलेल्या गोळ्या वेळेत घ्याव्यात, असे आवाहनही तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
लसीकरणानंतर थंडी ताप आला तरी घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणानंतर घेतलेल्या गोळ्या वेळेत घ्याव्यात, असे आवाहन आरोग्य अधिकारी किंवा तज्ज्ञ डॉक्टरच्या माध्यमातून करावे.
हृदयरोग किंवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास काहीही हरकत नाही. लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. उलट लस न घेणे म्हणजे आपली रिस्क वाढवून घेण्यासारखेच आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही लस घेतलीच पाहिजे.
- डॉ. अभय जैन, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ, अकोला
कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. ही लस घेणे चांगलेच आहे. कोणाला काही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन या लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत.
- डॉ. आनंद शर्मा, मूत्रपिंडविकार तज्ज्ञ
कोरोना प्रतिबंधक लस घेणे फायद्याचेच आहे. लसीमुळे आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने ही लस घ्यायला हवी.
डॉ. झिशान हुसेन, जनरल फिजीशियन, अकोला
आतापर्यंत लस दिली -२४,१३६
ज्येष्ठ नागरिकांना दिली लस - ६९१८